दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीवर भर
वाशी ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाला नवीन वस्तू खरेदी करतात. यामध्ये घरगुती उपकरणांसोबतच सोने आणि वाहन खरेदीकडे नागरिकांचाअधिक कल असतो. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली असून १ ते ५ ऑक्टोबर या पाच दिवसात वाशी आरटीओ कार्यालयात एकूण ६१६ नवीन वाहनांची नोंद झाली आहे.
मागील दीड वर्षांपासून कोरोना आणि टाळेबंदीने आर्थिक मंदीचा फटका सर्व सामान्यांना बसला होता. परंतु, यंदाचे वर्ष सर्वच सण उत्सव कोरोना मुक्त नियमातून साजरे करण्यात येत आहे. तसेच सर्वांचे रोजगार पूर्वपदावर आलेले आहेत. त्यामुळे सण-वाराला नागरिक अधिक खरेदी करत आहेत. त्यातच दसरा सण नवीन वस्तू खरेदीसाठी अधिक शुभ मानला जात असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिक वाहन खरेदीला पसंती देत असतात.
मात्र, मागील दोन वर्षे कोरोना टाळेबंदीने नागरिक आर्थिक संकटात सापडल्याने वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागला होता. सन २०२० दसऱ्याच्या दिवशी अवघी ६३ नवीन वाहने तर मागील वर्षी १०२ वाहनांची तर यंदा १११ वाहनांची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षात कोरोना मुळे देशाला आर्थिक मंदीचा फटका बसला होता. त्याचा परिणाम नवीन वाहन खरेदीवर देखील झाला होता. परंतु, आता उद्योगधंदे, व्यवसाय उभारी घ्ोत असून आर्थिक परिस्थिती देखील हळूहळू सुरधारत आहे. त्यामुळेच यंदा उत्साहाने नागरिकांनी नवीन वाहन खरेदी केलेली आहे. यावर्षी १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नवी मुंबई आरटीओ कार्यालयात ६१६ नवीन वाहनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये दुचाकी २८३ आणि २३९ चार चाकी वाहनांचा समावेश आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे नवीन वाहन खरेदीवर मोठा परिणाम झाला होता. परिणामी, नवीन वाहन खरेदी मंदावली होती. यंदा सर्वत्र रोजगार खुले असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदीमध्ये भर पडत असून यंदा वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
-हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई.