अनधिकृत मासे विक्रेत्यांवर महापालिकेची  कारवाई 


वाशी ः महापालिका कोपरखैरणे विभागाच्या वतीने कोपरखैरणे परिसरात अनधिकृतरित्या मासे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी सहा मासळी विक्रेत्यांचे साहित्य जप्त करुन ते कोपरखैरणे डंपिंग ग्राऊंड येथे जमा करण्यात आले.

नवी मुंबई शहरात जागो जागी परप्रांतीय मासळी विक्रेते अनधिकृतरित्या व्यवसाय करत असल्याने नवी मुंबईतील स्थानिक भूमीपुत्रांचा मासळी विक्रीचा उरला-सुरला व्यवसाय पण धोक्यात आला आहे. परिणामी, स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा अनधिकृत मासळी विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषद सदस्य  आमदार रमेश पाटील यांनी केली होती.

आ. रमेश पाटील यांच्या सदर मागणीची दखल घेत महापालिका कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे  यांच्या निर्देशानुसार ७ ऑक्टोबर रोजी कोपरखैरणे, सेक्टर-१,२,३ आदि भागात अनधिकृतरित्या मासळी विक्री करणाऱ्या ६ फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

दरम्यान, विभागात अशा प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर यापुढेही सातत्याने करवाई करण्यात येईल, असे इशारा कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर