महापालिका मुख्यालयात एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग मशीन

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारत वेगळया स्वरुपाच्या आकर्षक वास्तुरचनेमुळे आयकॉनिक इमारत म्हणून देशभरात नावाजली जाते. या ठिकाणी विविध कामांकरिता नागरिकांची तसेच अभ्यागतांची नेहमीच वर्दळ असते. सद्यस्थितीत रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांची रजिस्टरला नोंदणी करुन मुख्यालयात प्रवेश देण्यात येतो. या ठिकाणी मानवीय पध्दतीने व्यक्तींची आणि त्यांच्याकडील बॅग तसेच इतर सामानांची तपासणी करण्यात येते. सदर पध्दतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे प्रस्तावित होते.

त्या अनुषंगाने मुख्यालयात आणलेल्या सुरक्षा उपकरणामधील एक्स-रे बॅगेज स्कॅनिग मशीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ६ ऑवटोबर पासून कार्यान्वित करण्यात आली. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितिन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे, परिमंडळ-१चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाचे उपआयुक्त अनंत जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

एक्स-रे बॅगेज स्कॅनिग मशीनद्वारे महापालिका मुख्यालयात येणाऱ्या व्यक्तीकडील साहित्य या मशीन मधील स्वयंचलित पट्ट्यावर ठेवले जाणार असून त्या साहित्याचे स्कॅनींग होऊन असुरक्षित वस्तू असल्याचे त्वरित निदर्शनास येणार आहे. मुख्यालयातील तळमजल्यावरील प्रवेशद्वार आणि तळघरातील प्रवेशद्वार (बेसमेंट) या दोन ठिकाणी या स्कॅनिग मशीन ठेवण्यात येणार असून त्या हाताळण्याचे रितसर प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत भर पडली असून ती अधिक सक्षम झाली आहे.
अशाचप्रकारे महापौर कार्यालय आणि आयुक्त कार्यालय या ठिकाणी पोल डिटेक्टर सुरक्षा साधने कार्यान्वित करण्यात आली आहेत. या माध्यमातून असुरक्षित वस्तुंवर काटेकोर नजर ठेवली जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा व्यवस्था सक्षम होण्याकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या शासकीय संस्थेने सुरक्षा परीक्षणामध्येही सदर उपकरणे बसविणेबाबात सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात दोन एक्स-रे बॅगेज स्कॅनिग मशीन्स आणि दोन पोल डिटेक्टर सुरक्षा उपकरणे कार्यान्वित होत असून लवकरच व्हिझिटर मॅनेजमेंट सिस्टीम, व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. याद्वारे महापालिका मुख्यालयात येणाऱ्या नागरिक आणि अभ्यागत यांची सर्व माहिती घेऊन त्यांना ई-पास देऊनच मुख्यालयात प्रवेश दिला जाईल. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यालयात येणाऱ्या वाहनांची यांत्रिकी तपासणी करुनच आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीवर भर