ज्येष्ठ नागरिक दिनी अनुभवसमृध्द पिढीचा गौरव

नवी मुंबई ः ज्येष्ठ नागरिक समाजाचे अनुभव संपन्न महत्वाचे घटक आहेत. सदर बाब लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई देशातील अग्रगण्य महापालिका असून नवी मुंबईच्या प्रगतीशील वाटचालीत ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत त्यांच्या अंगभूत कला-क्रीडागुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम आयोजित करुन दरवर्षी जागतिक ‘ज्येष्ठ नागरिक दिन'चे औचित्य साधून विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येत असते.
मागील दोन वर्षे कोव्हीड मुळे आयोजित करता न येऊ शकलेला ‘ज्येष्ठ नागरिक दिन' समारंभ विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर आ. गणेश नाईक, आ. सौ. मंदाताई म्हात्रे, आ. रमेश पाटील, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, फेसकॉम या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव सुरेश पोटे, आदि उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक समाजातील अत्यंत महत्वाचा घटक असून नवी मुंबई महापालिका सुरुवातीपासूनच ज्येष्ठांविषयी आपुलकीने काम करीत आहे. ज्येष्ठांची विरंगुळा केंद्रे त्यांच्यासाठी एकत्र जमून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा मानसिक आधार असून सध्याच्या २७ विरंगुळा केंद्रांच्या संख्येत वाढ करावी, अशी सूचना आ. गणेश नाईक यांनी केली. त्याचप्रमाणे अडचणीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहकार्याचा हात देण्यासाठी संपर्क क्रमांक असणारे मदत केंद्र सुरु करावे, असेही त्यांनी सूचित केले.  

आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका ज्येष्ठांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करीत आपल्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक भवन अर्थात ‘ओल्ड एज होम'चे काम मार्गी लागले असून लवकरच ते आपल्या सेवेसाठी कार्यान्वित होईल, असे सांगितले. यामुळे आधार गमाविलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात मिळेल असा विश्वास आमदार सौ. म्हात्रे यांनी व्यक्त केला.

आ. रमेश पाटील यांनी निवासयोग्य शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक होत असताना ज्येष्ठांनाही आपुलकी देणारे शहर असल्याचा यावेळी विशेष उल्लेख केला.
आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सदर पहिलाच कार्यक्रम असल्याने माझ्या आयुक्त म्हणून कामकाजाची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने होते, हीच भाग्याची गोष्ट आहे. आरोग्य सुविधा आणि इतर बाबींमुळे आयुर्मान वाढत चालल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. आजच्या काळातील विकेंद्रीत कुटुंब पध्दतीमुळे संवाद कमी झालेल्या जगात ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन आपल्या समवयस्क लोकांशी संवाद साधण्यासाठी विरंगुळा केंद्रे काळाची गरज असल्याचे मत महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या २३२ ज्येष्ठ नागरिकांचा तसेच लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा २६ दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कॅरम (१०८ स्पर्धक), बुध्दीबळ (३२ स्पर्धक), गायन (३७ स्पर्धक), काव्यवाचन (१९ स्पर्धक), वेशभुषा (८ स्पर्धक), कथाकथन (१३ स्पर्धक), नाटिका (४ स्पर्धक), ब्रीझ (२१ स्पर्धक) आणि निबंध (२४ स्पर्धक) अशा विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला.

यामध्ये कॅरम स्पर्धेत पुरुष गटात सतीश करवाडकर आणि महिला गटात अमिता पै विजेते ठरले. बुध्दीबळ स्पर्धेत रमेश मोहिते, गायन स्पर्धेत गणपत सावंत, काव्यवाचन स्पर्धेत रेखा वाळवेकर, वेशभूषा स्पर्धेत अंकुश जांभळे, कथाकथन स्पर्धेत अरविंद वाळवेकर, नाटिका स्पर्धेत राम काजरोळकर, निबंध स्पर्धेत प्रज्ञा सारंग आणि ब्रीज स्पर्धेत दिलीप वैद्य आणि जयंत कुमार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन'तर्फे ई-श्रम कार्ड, रेनकोटचे वाटप