शारदोत्सवाला शानदार सुरुवात

पनवेल : नवी मुंबई बंगाली असोसिएशनतर्फे साजऱ्या केल्या शारदोत्सवाचे यंदा ४३वे वर्ष असून संपूर्णपणे वातानुकूलित सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे अतिशय उत्साहात व दिमाखात हा सोहळा शानदारपणे (शनिवार, दि.०१) सुरू झाला असून दिनांक ०५ ऑक्टोबर पर्यंत हा सोहळा असणार आहे. 

        कोविड महामारीने जनजीवन पुरते ठप्प झाले होते त्यामुळे सण व उत्सवांची अतिशय आतुरतेने वाट पाहिली जात होती.  या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून यंदाच्या वर्षी "मानवतेचे जतन करत साजरा करू या जीवनाचा सोहळा" ही अतिशय समर्पक थीम आहे.

     असोसिएशनच्या वतीने बंगाली पारंपरिक पद्धतीने पर्यावरणस्नेही आणि अतिशय नयनरम्य असा शारदोत्सव साजरा केला जात आहे. १६ फीट उंच मूर्तीची फ्रेम मोल्डेड फोम कोरीवकामाने सुशोभित केली आहे. बंगालच्या पारंपरिक कलाप्रकाराचे मनोहारी दर्शन याठिकाणी लाभत आहे.  पुष्पांजली, संधि पूजन, कुमारी पूजा आणि सिंदूर उत्सव असे सर्व पारंपरिक विधी याठिकाणी केले जातील. शारदोत्सवाच्या पाचही दिवशी सर्वत्र उत्सवाचे वातावरण असणार आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना विविध कॉर्पोरेट, नॉन-फूड व फूड स्टॉल्सचा आनंद घेता येत असून तब्बल ५० फूड आणि ४० नॉन-फूड स्टॉल्स या वातावरणातील मौजमजा, आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि उत्सव सर्वांसाठी संस्मरणीय बनवण्यासाठी सज्ज आहेत.

 वेगवेगळे कारीगर, कलाकार दूरवरून येऊन या शारदोत्सवात आपापल्या विविध वस्तू प्रस्तुत करणार आहेत. एकापेक्षा एक सरस स्वादिष्ट खाद्यपदार्थांची विशेष रेलचेल याठिकाणी आयोजित केली जाणार आहे. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीनही दिवशी सर्व भाविकांना प्रसिद्ध मिश्र भाज्यांची खिचडी, भाजा, मिष्टी आणि चटणी असा विशेष भोग सुपारीच्या पानांपासून बनवलेल्या ताटवाट्यांमध्ये दिला जाणार असून.  वातानुकूलित हॉलमध्ये भोगचा आस्वाद घेत असताना संगीत मनोरंजन व फॅशन शो ची पर्वणी या ठिकाणी आहे.

 बंगालमधील लोकप्रिय कलाकार दुर्निबर साहा, टीव्हीएस सारेगम व इंडियन आयडॉलमधून घराघरात पोहोचलेले इमॉन चॅटर्जी व मेखला दासगुप्ता, ख्यातनाम डान्स ट्रूप आंगिक डान्स अकॅडेमी यांनी सादर केलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे चंडालिका, बँड वैद्यास यांचे परफॉर्मन्सेस होणार आहेत. इतकेच नव्हे तर, बॉलिवूड मेगा स्टार शान महानवमीच्या रात्री आपला विशेष परफॉर्मन्स सादर करण्यासाठी याठिकाणी येणार आहे. या दुर्गोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एनएमबीएचे सदस्य अशीम डे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 स्वच्छ शहरासाठी नवी मुंबई पुन्हा सज्ज