उरण : हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे.अशा डासांची उत्पत्ती ही चाणजे,चिरनेर,मोठी जुई सह इतर ग्रामपंचायत हद्दीत होत असल्याने हत्तीरोगाचे रुग्ण याठिकाणी आढळून येत आहेत.तरी उरण तालुक्यात पसरत असलेल्या हत्तीरोगाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे राबवून डायथिलकाबीमाझिन ( डीईसी) या गोळ्यांचे वाटप रुग्णांना करण्यात यावे अशी मागणी हत्तीरोग बाधित रुग्णांचे नातेवाईक मंडळी करत आहेत.
हत्तीरोग हा क्युलेक्स डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. डास चावल्यानंतर हत्तीरोगाची लक्षणे ही ८ ते १२ महिन्यांनंतर दिसतात.यामध्ये रुग्णांचे पाय ( अवयव )वूषण हे आकाराने जाड होतात व रुग्णांना हालचाल करणे अवघड होवून बसते. हत्तीरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून १० वर्षांपूर्वी उरण तालुक्यात जनजागृती, सर्व्हे करण्यात आले होते. यावेळी चाणजे, चिरनेर, मोठे भोम परिसरात हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी आरोग्य विभागाकडून हत्तीरोग बाधित रुग्णांना मोफत ( डीईसी) गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते.त्यानंतर नूकताच आरोग्य विभागाकडून हत्तीरोग बाधित रुग्णांचे सर्व्हे करण्यात आले आहे.परंतु हत्तीरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी डायथिलकाबीमाझिन ( डीईसी) गोळ्यांचे वाटप करण्यात आले नसल्याची बाब हत्तीरोग बाधित रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. तरी शासनाने उरण तालुक्यात हळूहळू पसरत असलेल्या हत्तीरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण सह चिरनेर,मोठे भोम परिसरात हत्तीरोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. तरी शासनाने या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन करुन ज्या रुग्णांना हत्तीरोगाची लक्षणे आढळून येत असतील, अशा रुग्णांना डायथिलकाबीमाझिन (डीईसी) या औषधाचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- सामाजिक कार्यकर्ते - अनंत नारंगीकर