एका तोतया पोलिसाला नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या स्वाधीन
पोलीस बतावणी करणाऱ्या तोतया पोलिसाला नागरिकांनी पकडले
नवी मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकांजवळचे दागिने लुबाडून रिक्षातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटापैकी एका तोतया पोलिसाला नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नवीन पनवेल भागात गत बुधवारी सकाळी घडली. अली जाफरी (37) असे या तोतया पोलिसाचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याला पोलीस बतावणी केल्याप्रकरणी अटक केली आहे.तसेच पळून गेलेल्या त्याच्या इतर दोघा साथीदारांचा शोध सुरू केला आहे. नवीन पनवेल मधील विचुंबे भागात राहणारे शरद कांबळे (60) हे सेवानिवृत्त झाले असून गत बुधवारी त्यांना कामानिमित्त मुंबईत जायचे होते. त्यासाठी ते सकाळी 9 च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन येथे पायी चालत जात होते. यावेळी त्यांच्या जवळ आलेल्या दोघा भामट्यांनी स्पेशल पोलीस असल्याचे, तसेच पुढे चेकिंग सुरू असल्याचे सांगत कांबळे यांना अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले.
यावेळी कांबळे यांनी घाबरून गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी काढल्यानंतर दोघा भामट्यानी कांबळे यांना बोलण्यात गुंतवून सदरचे दागिने कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा करून ते स्वतःकडे घेतले. हा प्रकार त्या भागातील एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने मोठयाने चोर चोर अशी अरडा ओरड केली. त्यामुळे दोघा भामट्यांनी जवळच उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसून त्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या भागात जमलेल्या नागरिकांनी अली जाफरी याचा हात पकडुन त्याला खाली ओढले. मात्र त्याचे दोघे साथीदार कांबळे यांचे 60 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन रिक्षामधून पळून गेले. यावेळी नागरिकांनी पकडलेल्या अली जाफरी या भामाट्याला मारहाण करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.