नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची  बदली

नवी मुंबई -  मागील काही दिवसांपासून बदलीच्या चर्चेत असलेले महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुकी करण्यात आली आहे. तर बांगर यांची ठाणे आयुक्तपदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात कोरोना संसर्ग परमोच्च शिखरावर असताना तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करून शासनाने दोन वर्षापूर्वी १४ जुलै २०२० रोजी  नवी मुंबई महापालिकेत आयुक्तपदाची वर्णी लागली होती. बांगर यांनी पदभार  सांभाळताच आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. १५ दिवसात केंद्राच्या परवानग्यासह स्वतःची अत्याधुनिक करोना चाचणी प्रयोगशाळा सुरु केली हे त्यांचे पहिले यश होते आणि आपल्या कौशल्याने कोरोना नियंत्रणात आणला. तसेच नागरीकांच्या तक्रारींना तात्काळ दाद देत असल्याने अल्पावधीतच बांगर नवी मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तसेच आठ कोटींच्या उद्यान घोटाळा चौकशीचे आदेश त्यांनी दिले. मालमत्ता विभागात वर्षानुवर्ष एकाच जागी  तळ ठोकून बसलेल्या १२० कर्मचाऱ्यांची  एकाच दिवशी बदली करून मालमत्ता विभागातील मक्तेदारी मोडीत काढली. बांगर यांच्या ह्या जरी जमेच्या बाजू असल्या तरी अतिक्रमण विभाग आणि स्थापत्य विभागात होत असलेल्या गैरकारभाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करीत गेल्याने बांगर यांची कारकीर्द संशयाचा भोवऱ्यात सापडत गेली आणि तेव्हापासूनच बांगर यांच्या बदलीच्या वावड्या उठू लागल्या. मात्र या दरम्यान ठाणेकरांचा आशीर्वाद बांगर यांना कायम राहिला. त्यामुळे त्यांची जरी बदली झाली असली तरी त्यांना ठाण्याचे ठाणेकर  केले आहे. तर बांगर यांच्या जागी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत बोलावले

नवी मुंबई महापालिकेत शासनामार्फत प्रतिनियुक्तीवर आलेले परवाना विभागाचे उपयुक्त डॉ. श्रीराम पवार व  घनकचरा उपयुक्त डॉ . बाबासाहेब राजळे यांना शासनाने परत  बोलावून घेतले आहे .यातील डॉ. बाबासाहेब राजळे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कारण प्रतिनियुक्तीवर एकदा नियुक्ती होत असताना राजळे  हे चौथ्यांदा महापालिकेत नियुक्तीवर आले होते.

तसेच नवी मुंबई महापालिकेत कायम स्वरुपी नियुक्ती व्हावी म्हणून राजळे यांनी प्रशासन दरबारी अर्ज केला होता. त्यामुळे राजळे यांची बदली करावी म्हणून शासन दरबारीअनेक तक्रारी गेल्या होत्या आणि अखेर २९ सप्टेंबर रोजी शासनाने त्यांना मुळ सेवेत बोलावून घेतले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कामोठे येथे कै. विश्वनाथ तांबोळी यांच्या स्मरणार्थ जागर आरोग्याचा!