झाडे तोडणे आणि स्थलांतर करणे बाबत हरकती सूचना

झाडे तोडणे आणि स्थलांतर करणे बाबत हरकती सूचना

नवी मुंबई-:मनपाच्या जुईंनगर येथील नियोजित उड्डाण पुलाच्या कामात  ३१९ झाडे बाधीत होत आहेत. त्यामुळे सदर झाडे तोडणे आणि स्थलांतर करणे बाबत  मनपा उद्यान विभागाने हरकती सूचना मागवल्या होत्या. मात्र सात दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर काही नागरिकांनी सदर झाडांबाबत आक्षेप घेतल्या नंतर मनपा उद्यान विभागाने सदर प्रस्तावास  हरकतीसाठी सात दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे.

वाशी पाम बीच मार्गावर  नियोजित महात्मा फुले भवन वाशी ते कोपरी पर्यंत उड्डाण पूल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पात ३९० झाडांचा बळी जाणार असल्याने राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटले. त्यांनतर मनपा उद्यान विभागाने झाडांच्या  हरकतीसाठी एक महिना अतिरिक्त मुदत वाढ दिली. त्यांनतर  १९०० च्या वर हरकती आल्या. मात्र यातील ३५ ते ४०% हरकती या अपूर्ण व एक सारख्या असल्याचे समोर आले होते. त्याच प्रकारे आता मनपा तर्फे सानपाडा जुईंनगर येथील रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे.

 या कामात ३१९ झाडे बाधीत होणार असून १९४ झाडे तोडली जाणार आहेत व १२५ झाडे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा उद्यान विभागाने ९ सप्टेंबरला वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि यावर सात दिवसात हरकती घेणे बंधन होते. मात्र सदर हरकतींचा कालावधी उलटल्यानंतर काही नागरिकांनी सदर झाडे तोडण्यात आक्षेप घेत मुदत वाढवण्याची मागणी केली. त्यानुसार उद्यान विभागाने या प्रस्तावास सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाशी कोपरी उड्डाण प्रस्तावात ज्या प्रमाणे अपूर्ण आणि एक सारख्या हरकती आल्या तर यावर सुनावणी घेण्यास मोठा कालावधी लागणार असून वाशी कोपरी उड्डाणपूल प्रकल्पा  प्रमाणे हा प्रकल्प देखील रेंगाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची  बदली