नवी मुंबईत जानेवारी ते आतापर्यंत मलेरियाचे ६८ तर डेंग्युचे १० रुग्ण 

नवी मुंबई -: सध्या उन- पाऊस सुरू असून वातावरणात  वारंवार बदल होत असल्याने नवी मुंबईत साथीचे आजार बळावत आहेत. त्यामुळे नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया,  स्वाईन फ्ल्यू या आजारांनी देखील डोके वर काढले आहे.  जानेवारी पासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे १० रुग्ण, मलेरियाचे ६८ तर स्वाईन फ्ल्यूच्या ४१ रुग्णांची नोंद महापालिकेकडे आहे.

सन२०२०-२१ कालावधीत करोनाने डोके वर काढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सवय जडली होती. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भर देण्यात येत होती . त्यामुळे नवी मुंबई शहरात करोना व्यतिरिक्त साथीचे आजार रुग्ण कमी झाले होते. परुंतु मागील वर्षीपासून पुन्हा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मागील वर्षी खासगी बांधकाम कंपनी, तुर्भे, गावठाण, झोपडपट्टी विभाग, सिडको वसाहतीतील घरे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांची पैदास आढळली होती. यावर्षी ही हवामानात होणाऱ्या बदलामुळे नवी मुंबई शहरात सध्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे.  सध्या आजारांवर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सन २०२१ मध्ये डेंग्युचे ८ रुग्ण तर मलेरियाचे ४४ रुग्ण होते . तर यंदा सप्टेंबर पर्यंत मलेरियाचे ६८ रुग्ण तर डेंग्युचे १० रुग्ण झाले आहेत. अशी माहिती मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेने डास उत्पत्ती शोधण्यासाठी ७७८२ ठिकाणी भेटी दिल्या आहेत. या  डास उत्पत्ती शोध महिमेत शहरातील २९७ ठिकाणी डेंग्यू डासांची पैदास आढळली आहे. ६४८३ घरांमध्ये औषध फवारणी तर ७३३२ घरांत धुरफवारणी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

झाडे तोडणे आणि स्थलांतर करणे बाबत हरकती सूचना