रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास सूट

 

नवी मुंबई ः यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर सदर निर्णय घेतला आहे.

पर्यावरण आणि वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन-नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच २ दिवस जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी ३, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त १ ऑक्टोबर रोजी आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहर व्हावी टुरिस्ट सिटी...