एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळ पनवेल आयोजित झंकार नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरुवात

नवरात्रीला पनवेलकरांसाठी विविध कार्यक्रमांची पर्वणी

पनवेल :   श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळ पनवेल आयोजित 'झंकार नवरात्रोत्सव २०२२' या नवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (सोमवार दि.२६ सप्टेंबर) घटस्थापना झाली असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी मैदानावर रोज संध्याकाळी ७:३० वाजता लाईव्ह दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. यासह प्रत्येक दिवशी १०० विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तर शेवटच्या दिवशी महाविजेत्याला 'स्कुटी' दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

         झंकार नवरात्रोत्सव पनवेलमधील सर्वात मोठा नवरात्रोत्सव मानला जातो. गेली १६ वर्षे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्धरित्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोरोनामुळे गेली दोन वर्षे निर्बंध असल्यामुळे नवरात्रीचा सण साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाने काढता पाय घेतल्यानंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळासह देवी भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

       यावर्षी नवरात्रोत्सव सणानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यात प्रामुख्याने दि.२६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १० वाजेपर्यंत दांडिया रास, २९ सप्टेंबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १० वाजेपर्यंत 'रेट्रो/बॉलिवूड नाईट' या थीम वर आधारित वेशभूषा व नृत्य, ३० सप्टेंबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत पारंपरिक थीमवर (मराठी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी इत्यादी) आधारित वेशभूषा व नृत्य, १ ऑक्टोबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १० वाजेपर्यंत समूह स्पर्धा, २ ऑक्टोबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १० वाजेपर्यंत फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ३ ऑक्टोबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत कपल स्पेशल, ४ ऑक्टोबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत महाअंतिम स्पर्धा आणि ५ ऑक्टोबर संध्याकाळी ७:३० ते रात्रौ १० वाजेपर्यंत दसरा साजरा करण्यात येणार आहे.

         यावर्षी दांडिया रास गरब्यानिमित्त श्री स्वामी इव्हेंट्स प्रस्तुत 'एक्स्प्रेस दांडिया' या बहारदार लाईव्ह दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पार्श्वगायक/संगीतकार स्वप्नील गोडबोले, सुप्रसिद्ध गुजराती गायक हरीश ठक्कर, सुप्रसिद्ध गायिका कोमल तेंडुलकर, झी मराठी सारेगम फेम गायिका रुपाली वराडकर, सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील वादक श्याम बांगर, सुनील जाधव (बाबा), साहिल रेळेकर यांच्यासह संपूर्ण वादकांचा समूह दसऱ्यापर्यंत लाईव्ह दांडिया नाईटद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे संगीतकार अमीर हडकर हे स्वतः दसऱ्याला दांडिया नाईटमध्ये खास उपस्थित राहणार असून मनोरंजन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पाटील करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सभागृहनेते परेश ठाकूर, एमसीसीएच सोसायटी अध्यक्ष राजू गुप्ते, एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमीत झुंजारराव यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीने केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका कर्मचाऱ्यांना ५० हजार तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी