नवी मुंबई मध्ये जागो जागी ‘आदिशक्ती'ची प्रतिष्ठापना

वाशी ः अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी होते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते दसरा दिन अर्थात ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. यंदा कोरोनोनांतर पहिल्यांदाच गणेशोत्सव अगदी धामधुमीत पार पडणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाचा आनंद आधीच द्विगुणित झाला असल्याने नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, त्यात घरघुती मूर्तीचा देखील अधिक समावेश आहे.

थेट गाव-गावठाणांच्या जमिनीवर नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात आजही ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात सण साजरे करुन संस्कृतीचे जतन होत आले आहे. त्याच धर्तीवर आता नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यंदा मागील दोन वर्षाचे कोविड निर्बंध हटवल्याने सर्व सण उत्साहात साजरे होत असून, नवरात्रोत्सवामध्ये देखील तोच उत्साह भक्तांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे २६ सप्टेंबर रोजी नवी मुंबई शहरात दुर्गा माता, भवानी माता, महिषासूर मर्दिनी, कालिका माता, रेणुका माता, सप्तश्रृंगी माता, वैष्णव देवी अशा देवीच्या अनेक रुपात सार्वजनिक मंडळांसह घरघुती देवी मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

बेलापूर किल्ले गावठाण येथील पुरातन पेशवेकालीन श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. श्री गोवर्धनी माता मंदिरात ५ ऑक्टोबर पर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

महापालिका तर्फे आरोग्याचा जागर

नवी मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी महापालिका कार्यक्षेत्रात नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान' २६ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असून, सदर अभियान ५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियान कालावधीत नवी मुंबई कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वागीण तपासण्या करण्यात येणार असून नवरात्री निमित्तमहापालिका तर्फे आधुनिक ‘आदिशक्ती'साठी आरोग्याचा जागर केला जाणार आहे.

गाव देवी मंदिरात घटस्थापना

नवी मुंबई शहरात आजही गाव गावठाणात नवरात्रोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. नवी मुंबई मधील प्रत्येक गावात ग्राम देवतेचे मंदिर असून, या मंदिरात तेथील ग्रामस्थांमार्फत घट स्थापना केली जाते. तर गावागावात कुलदैवत (देव्हाऱ्या) ठिकाणी देखील घटस्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते. काही देव्हाऱ्यात देवीच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना केली जाते.

दांडिया प्रेमींमध्ये उत्साह

मागील दोन वर्षे कोविड मुळे सणांवर निर्बंध होते. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा सणांवरील सर्व निर्बंध शिथिल केल्याने सण उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील बेलापूर, सीवूड्‌स, नेरुळ, सानपाडा, वाशी, तुर्भे, ऐराली, घणसोली, दिघा, कोपरखैरणे आदी भागात सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात भरघोस बक्षिसांची बरसात केली जाणार आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधी नंतर दांडिया खेळायला मिळणार असल्याने दांडिया प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळ पनवेल आयोजित झंकार नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरुवात