कचऱ्यातून साकारली ६० फुट ‘पलेमिंगो' रेखाकृती

जमिनीवर 60 x 32 फूट आकाराची फ्लेमिंगोची भव्य आकर्षक प्रतिकृती तयार 

नवी मुंबई ः केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये सहभागी देशातील १८०० हून अधिक शहरांमध्ये स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन नवी मुंबई महापालिकेने आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. या मधील एक अभिनव उपक्रम ‘पलेमिंगो सिटीे' म्हणून नावारुपास येत असलेल्या नवी मुंबई शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहभागातून पामबीच मार्ग नजिकच्या विस्तृत खाडीकिनारा परिसरात राबविण्यात आला. यामध्ये मॅनग्रुव्हज सोल्जर, जयश्री फाऊंडेशन, डिव्हाईन फाऊंडेशन या स्वच्छता आणि पर्यावरणविषयक नियमित कार्यरत असणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी आणि जागरुक नागरिक अशा २०० हुन अधिक नागरिकांमार्फत राबविण्यात आला.

सदर ‘कांदळवन स्वच्छता मोहीम'चे आयोजन महापालिका घनकचरा व्यवस्थापन आणि ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष'च्या वतीने करण्यात आले होते. पामबीच मार्गावरील तिरंगा झळकावित विक्रमी ७.५ कि.मी. अंतराच्या मानवी साखळीचा उपक्रम पार पाडल्यानंतर त्यामध्ये सहभागी २०० हुन अधिक पर्यावरणशील नागरिक आणि युवक पामबीच मार्गाजवळील टी.एस.चाणक्य शेजारील शिवमंदिराच्या परिसरात जमा झाले. यानंतर त्यांनी तेथील कांदळवन आणि परिसराची स्वच्छता केली. सदर ठिकाणी संकलित ४५० किलोहुन अधिक कचऱ्यामध्ये थर्माकोल, प्लास्टिक बॉटल्स, काचेच्या बाटल्या, चपला, बूट, कॅन, ऑईलचे डबे, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग, प्लास्टीक, फिशींग नेटस्‌चे तुकडे अशा विविध प्रकारच्या वस्तुंचा समावेश होता. सदर सर्व संकलित कचरा तेथील मोकळ्या जागेत एकत्रित आणण्यात आला.

यातील अत्यंत महत्वाची विशेष बाब म्हणजे मोकळ्या जागेत कचरा आणल्यानंतर तो विशिष्ट प्रकारे ठेवण्यासाठी टाकाऊ साहित्यापासून कलात्मक वस्तू, शिल्पाकृती तयार करणाऱ्या ‘किशोर विश्वास आर्टस्‌ संस्था'च्या प्रतिनिधींनी जमिनीवर ६० फुट लांब आणि ३२ फुट रुंद पलेमिंगो पक्षाची रेखाकृती जमिनीवर आखून ठेवली होती. या पलेमिंगो आकृतीच्या कोणत्या भागात कोणत्या स्वरुपाचा कचरा ठेवायचा याचे नियोजन आधीच करुन ठेवण्यात आले होते. त्यानुसार पलेमिंगो रेखाकृतीच्या विशिष्ट भागात गोळा केलेल्या कचऱ्याातील विशिष्ट प्रकारचा कचरा ठेवण्यात आला. याद्वारे जमिनीवर ६० X ३२ फुट आकाराची पलेमिंगोची भव्य आकर्षक प्रतिकृती तयार झाली.


स्वच्छताकार्य करताना त्यात जरा कल्पकता वापरली तर टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून चांगली निर्मिती होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण या माध्यमातून साकारले गेले. यामुळे उपक्रमात सहभागी नागरिकांना नवनिर्मितीचा आनंदही मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हजारो किलोमीटरचे समुद्री अंतर ओलांडून नवी मुंबईच्या ओढीने येणाऱ्या पलेंमिंगो पक्षांना सुरक्षित आणि हवेहवेसे वाटेल असे पर्यावरण उपलब्ध करुन देणे आणि ते टिकविणे आपल्या नवी मुंबईकरांची जबाबदारी असून कांदळवन स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून समुद्र अथवा खाडीच्या पाण्यात कचरा न टाकण्याचा तसेच सागरकिनारीही अस्वच्छता न करण्याचा संदेश प्रसारित करण्यात आला.

खाडी-समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर, कांदळवनात अस्वच्छता निर्माण करुन आपण सागरी जैवसृष्टीला हानी पोहोचवित आहोत, याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. ‘कांदळवन स्वच्छता मोहीम'च्या माध्यमातून तसेच मोहिमेत जमा झालेल्या कचऱ्यातून पलेमिंगोच्या कलाकृती निर्मितीतून हाच स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला. ‘इंडियन स्वच्छता लीग' अंतर्गत स्थापित ‘नवी मुंबई इको क्नाईटस्‌' या नवी मुंबईच्या संघात आपले कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या समवेत सहभागी होत प्रत्येक नागरिकाने घरातील दररोजचा कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण करुनच दिला जाईल, याकडे नियमितपणे कटाक्षाने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. -अभिजीत बांगर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मध्ये जागो जागी ‘आदिशक्ती'ची प्रतिष्ठापना