पाच महिन्यांपूर्वी केलेल्या कामांच्या सप्टेबरमध्ये निविदा

नवी मुंबई-: नवी मुंबई महानगर पालिकेत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तत्वतः मान्यतेच्या नावाखाली मर्जीतल्या ठेकेदारांकडून  पाच महिन्यांपूर्वी कामे करून घेतलेल्या   कामांच्या निवीदा आता सप्टेंबर मध्ये काढल्या जात आहेत. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार होत असून या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करोडो रुपयांची कामे केली जात आहेत. मात्र यातील बऱ्याच कामात अनियमितता आढळून येत आहे. ही कामे मर्जीतल्या ठेकेदारांमार्फत तत्वतः मान्यता घेऊन आधीच उरकली जात आहेत आणि नंतर या कामांच्या निविदा काढण्याचा फार्स केला जात आहे. ठाणे बेलापूर मार्गावरील विविध उड्डाण पुलांचे पाच महिन्यापूर्वी रंग काम उरकले आहे. मात्र त्याच्या निविदा आता सप्टेंबर मध्ये काढल्या आहेत. तसेच सदर उड्डाण पुलाचे एकत्रित कामाची निविदा काढण्याची गरज असताना त्याचे तुकडे तुकडे करून कामे केली जात आहेत. मात्र कामे केल्यानंतर निविदा काढल्याने निविदा विकत घेणाऱ्या इतर ठेकेदारांना नाहक भुर्दंड बसत आहे. तर अशा निविदा पूर्व होत असलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याप्रकरणी  उन्हाळी अधिवेशनात रणकंदन माजले होते. मात्र थोडीशी उसंत घेतल्यानंतर मनपा अभियंत्यांनी पुन्हा आपल्या भ्रष्टाचाराचा कित्ता गिरवण्यास सुरुवात केला असल्याचा आरोप होत आहे. तर या साऱ्या प्रकाराला प्रभारी शहर अभियंता संजय देसाई जबाबदार असून त्यांची तत्काळ बदली करून चौकशी करण्याची मागणी आर पी आय (आठवले गट) मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासहेब मिरजे यांनी केली आहे. मात्र सदर मागणी करून देखील मनपा अभियंत्यांनी पाच महिन्यांपूर्वी केलेल्या कामांच्या निविदा काढल्या आहेत.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?