नागरिकांनी केले नवी मुंबई पालिकेच्या पर्यावरणशील कामांचे कौतुक

इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महापालिकेचा पर्यावरणशील सहभाग


नवी मुंबई ः वर्ल्ड मिडीया ॲण्ड एक्पो यांच्या वतीने इलेक्ट्रीक वाहने, चार्जींग स्टेशन, बॅटरीज ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस याबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये पर्यावरणशील दृष्टीकोन जपत नवी मुंबई महापालिकेने सहयोगाची भूमिका घेतली होती. १४ आणि १५ ऑक्टोबर २०२२ रोजी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ड्राईव्ह इलेक्ट्रीक एक्सपो प्रदर्शनात इलेक्ट्रीक वाहने आणि उपकरणे संबंधी देशातील नामांकित उद्योग समुहांनी सहभाग घेतला होता.

या प्रदर्शनामध्ये नवी मुंबई महापालिकेनेही जनजागृतीपर स्टॉल उभारुन करुन आजच्या बदलत्या युगात इंधनाची कमतरता लक्षात घ्ोऊन इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर वाढावा याविषयी जागरुकता तसेच महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून केला जाणारा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर आणि इतर पर्यावरणपूरक कामे यांची चित्रांकित माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. स्टॉल मधील आकर्षक माहिती फलक तसेच एलईडी टिव्हीवर नवी मुंबई महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कामांची माहितीप्रद चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. महापालिकेच्या स्टॉलला हजारहुन अधिक नागरिकांनी भेट देत महापालिकेच्या पर्यावरणशील कामांचे कौतुक केले.


महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ नुसार इलेक्ट्रिक वाहन वापराला चालना देण्याकरिता आणि इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी तसेच याविषयी व्यापक जनजागृती व्हावी यादृष्टीने सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले तसेच अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित होते. सदर प्रदर्शनाचे यजमान शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेने या प्रदर्शनात सहभागी होत पर्यावरणशील असणाऱ्या ई-वाहनांचे महत्व अधोरेखीत केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाण्यातील होतकरू नवउद्योजकांसाठी स्वराज दिवाळी उत्सव