नवी मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल सत्तावीस हजार रुपये सानुग्रह अनुदान
नवी मुंबई ः दरवर्षीप्रमाणे नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकारी यांच्यासह करार पध्दतीवरील कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. येत्या २२ ऑवटोबर पासून सुरु होत असलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना गतवर्षी दिलेल्या सानुग्रह अनुदानात यंदा २ हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना २७ हजार रुपये तसेच करार-तात्पुरत्या स्वरुपातील कर्मचारी यांना २१ हजार रुपये आणि आशा वर्कर यांना ११ हजार रुपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना २५ हजार रुपये, करार-तात्पुरत्या स्वरुपातील कर्मचारी यांना १९ हजार रुपये आणि आशा वर्कर यांना ९ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक-माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने अथवा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी-कर्मचारी यांना २७ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरुपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी- कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांना २१ हजार रुपये इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.
याशिवाय सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले तसेच शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पध्दतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे २१ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
अशाप्रकारे एकूण ४४५४ अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे दिवाळी सणापूर्वीच रक्कम अधिकारी-कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना दिलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
दरम्यान, ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२' मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला असून या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घ्ोतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात आले आहे.