प्रलंबित अर्जांचा निपटारा त्वरित व्हावा यादृष्टीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या कालावधीत लोकसेवा पुरविण्याच्या कामकाजाला गती

नवी मुंबई : नागरिकांना समयोजित व कालबध्द सेवा पुरविण्यासाठी कटिबध्दता राखत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची अंमलबजावणी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरु आहे. यामधील प्रलंबित अर्जांचा निपटारा त्वरित व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आलेला आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महा पालिकेच्या वतीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणा-या ५१ लोकसेवांमधील प्रलंबित प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी सर्व विभागांना दिलेले होते. त्यानुसार लोकसेवा पुरविणारे संबंधित विभाग व विभाग कार्यालये यांना कालबध्द कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

शासन निर्देशानुसार १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रलंबित असणा-या लोकसेवा विषयक अर्जांबाबत तत्पर कार्यवाही करून २ ऑक्टोबर पर्यंत अर्ज प्रलंबित राहणार नाहीत अशाप्रकारची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागांनी तत्पर कार्यवाही करीत प्रलंबित ३४६३ अर्जांपैकी ३१४२ अर्जांवर कार्यवाही केली आहे व उर्वरित ३२१ अर्जांवर २ ऑक्टोबर पर्यंत कार्यवाही करण्याची प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये लोकसेवा अंतर्गत प्राप्त अर्ज, शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून प्राप्त अर्ज तसेच पीजी पोर्टलवरून प्राप्त अर्ज अशा सर्व अर्जांचा निपटारा करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमार्फत नागरिकांना विहित कालावधीत लोकसेवा पुरविण्याची कार्यवाही करण्यात येत असते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्य लोकसेवा आयोगाचे कोकण विभाग आयुक्त डॉ. किरण जाधव यांनीही समाधान व्यक्त केले होते. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या कालावधीत या विषयीच्या कामकाजाला अधिक गती मिळालेली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा