अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तळोजा गृहसंकुलात अग्निशमन यंत्रणेची पाहणी


खारघर ः  ‘सिडको'च्या तळोजा येथील गृहसंकुलातील केदार सोसायटी मधील घराला आग लागल्यावर संकुलातील अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास येताच ‘सिडको'च्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी तळोजा येथील गृहसंकुलात जाऊन तेथील अग्निशमन यंत्रणेची पाहणी केली.

तळोजा फेज-२ सेक्टर-१९मधील ‘सिडको'च्या केदार गृहसंकुलात १८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ क्रमांकाच्या इमारतीत १२ व्या मजल्यावरील अजय बिलोड यांच्या घरात आग लागल्यावर स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास आले. याबाबतचे वृत्त १९ फेब्रुवारी रोजी ‘आपलं नवे शहर'मध्ये ‘सिडको'च्या तळोजा गृहसंकुलातील घरात आग; आगीत घरातील साहित्य जळून खाक अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली होती. सदर बातमीची दखल ‘सिडको'ने घेतली आहे.

‘सिडको'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अग्निशमन कळंबोली येथील अग्निशमन केंद्राला पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कळंबोली येथील ‘सिडको'च्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी तळोजा,  सेक्टर-२१, २२, २७ मधील ‘सिडको'च्या संकुलातील ५० इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची पाहणी केली. यावेळी पाहणीमध्ये कळंबोली येथील संकुलातील अग्निशमन यंत्रणा कार्यरत असल्याचे तर तळोजा येथील गृहसंकुलात अग्निशमन यंत्रणेत काही ठिकाणी बिघाड तर काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याचे समजले.

दरम्यान, सदर प्रकरण उजेडात येताच ‘सिडको'च्या गृहसंकुलातील अग्निशमन यंत्रणा कार्यरत होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याविषयी कळंबोली अग्निशमन केंद्राचे अधिकारी स्वराज पाटील यांच्याशी संपर्क केला असता पाहणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉक्टर दाम्पत्याचा सन्मान