नवी मुंबई महापालिका द्वारे सन २०२३ या वर्षात वृक्ष गणनेसाठी करण्यात ३ कोटी ५० लाख रुपये खर्च

वृक्ष गणनेसाठी महापालिका खर्च करणार ३.५० कोटी

तुर्भे ः नवी मुंबई महापालिका द्वारे सन २०२३ या वर्षात वृक्ष गणनेसाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या विषयी वृक्ष प्राधिकरण अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली.

मागील वृक्ष गणना २०१५ या वर्षी  जी.आय.एस. आणि जी.पी.एस. तंत्र प्रणालीद्वारे करण्यात आली होती. त्यावेळीे शहरात ८५ लाख ७२ हजार २९५ इतके वृक्ष आढळून आले होते. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १८२ उद्याने विकसित करण्यात आली असून ११६ मोकळ्या जागेवर हिरवळ विकसित केली आहे. तसेच २२ ट्री बेल्ट आणि १५ चौक विकसित केले असून ७२ रस्ता दुभाजकांमध्ये सुशोभिकरण केले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान (हरित पट्टा विकसित करणे) अंतर्गत वर्ष २०१५ ते २०१८ क्षेत्र विकास प्रकल्प राबवण्यात आला. त्यामुळे शहरात वृक्षांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. शहरातील हरित क्षेत्र वाढावे यासाठी या प्रकल्पांमध्ये विविध जातीचे भारतीय प्रजातीचे असे (उदा. नारळ, बकुळ, निम, काजू, कदंब, सुपारी जातींचे) शहरातील हवामानाचा आणि भौगोलिक दृष्ट्या विचार करुन एकूण १६,२२९ वृक्ष लागवड करण्यात आली आहेत. सदर प्रकल्पामुळे शहराच्या सुशोभिकरणात भर पडली आहे. मोकळी जागा आणि रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ३९२ हून अधिक उद्याने, रोड डिव्हाडर आणि मोकळ्या जागा या ठिकाणी पर्यावरणाची जोपासना केली जात आहे.

त्यामुळे उद्यानांचे शहर म्हणूनही संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या १०८.६३८ चौरस कि.मी. क्षेत्रात हिरवळ शहराचे पर्यावरण रक्षण संवर्धन करत आहे. प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आणि विविध पर्यावरणवादी संस्था यांच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी वृक्षगणना झाल्यावर निश्चितच दीड कोटीहून अधिक वृक्ष असतील, असा विश्वास पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माजी नगरसेवक एम.के. यांच्यावर करण्यात आलेली तडीपारीची कारवाई अखेर न्यायालयाने केली रद्द