नवी मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या

 महापालिका प्रशासनात खांदेपालट

तुर्भे ः नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. याअंतर्गत सहाय्यक आयुक्त संजय तायडे यांची समाज विकास विभागातून घणसोली विभाग कार्यालय येथे, शशिकांत तांडेल (मालमत्ता विभाग) बेलापूर विभाग कार्यालय येथे, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त शंकर खाडे यांची दिघा विभाग कार्यालय येथे, चंद्रकांत तायडे भांडार विभागातून परवाना विभागात, बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांच्याकडे भांडार विभाग आणि मालमत्ता विभागाचा अतिरिवत कार्यभार सोपविण्यात आला आहे.

प्रशासकीय अधिकारी मनोहर गांगुर्डे यांची दिघा विभाग कार्यालयातून बदली करण्यात येऊन त्यांच्याकडे नेरुळ विभाग कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारी सुनिल पाटील यांची नेरुळ विभाग कार्यालयातून कोपरखैरणे विभाग कार्यालय येथे बदली करण्यात आली आहे. तुर्भे विभागाचे उपअभियंता प्रशांत पिंपळे यांची घणसोली विभागात, तर घणसोली विभागाचे उपअभियंता विश्वकांत लोकरे यांची तुर्भे विभागात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होणे बंधनकारक आहे. तसेच त्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये अन्यथा त्यांची अनुपस्थिती अनधिकृत गैरहजेरी समजण्यात येवून विनावेतन आणि विना भत्ते करण्यात येईल. शिवाय त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बदली आदेशात म्हटले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका द्वारे सन २०२३ या वर्षात वृक्ष गणनेसाठी करण्यात ३ कोटी ५० लाख रुपये खर्च