‘एमआयडीसी'तील रस्ते काँक्रीटीकरणामुळे उद्योगवाढीस चालना
‘महापालिका-एमआयडीसी'चे रस्ते व्हिजन अंतिम टप्यात
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिसरातील निवासी क्षेत्रातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर क्राँक्रीटीकरण करण्यात आल्याने नागरिकांची जशी वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली, त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका आणि
‘एमआयडीसी'ने एकत्रितरित्या रस्ते व्हिजन हाती घ्ोऊन एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात ‘एमआयडीसी'तील रस्ते चकाचक होऊन येथील उद्योजकांना दिलासा मिळणार
आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण ५०५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी एमआयडीसी क्षेत्रात जवळ १३६ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील शिळ-महापे रस्ता वगळता इतर ठिकाणचे रस्ते
‘एमआयडीसी'ने २००४ मध्ये नवी मुंबई महापालिका कडे हस्तांतरीत केले आहेत. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेने ‘एमआयडीसी'तील रस्ते वेळोवेळी दुरुस्त करुन सुस्थितीत ठेवले आहेत. याशिवाय १ डिसेंबर २००५ रोजी हस्तांतरीत करण्यात आलेला महत्त्वाचा असा १३.८० कि.मी. लांबीचा ठाणे-बेलापूर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम नवी मुंबई महापालिकेने पूर्ण केले आहे.
तसेच कोपरखैरणे फायर स्टेशन ते साऊथ कोस्ट हॉटेल राबाडेपर्यंतचा ठाणे-बेलापूर रस्त्याला समांतर असलेला ५.७ कि.मी. लांबीचा सर्व्हिस रस्ता देखील नवी मुंबई महापालिकेने तयार केला आहे.
‘एमआयडीसी'तील उद्योजकांचे या क्षेत्रातील येणे-जाणे सुलभ आणि जलदगतीने व्हावे यासाठी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील १३६ कि.मी. लांबीच्या सर्व रस्त्यांचा एकात्मिक विकास करण्याच्या दृष्टीने सदर रस्त्यांची तीन
टप्यात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्यात टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एकूण १३६ कि.मी लांबींच्या रस्त्यांपैकी ८३.९८ कि.मी. रस्त्यांची नवी मुंबई महापालिका मार्फत सुधारणा करुन रस्ते सुस्थितीत
करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्यात रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २८ मे २०१४ रोजी नवी मुंबई महापालिकेने ‘एमआयडीसी'कडे हस्तांतरीत केलेल्या ए, आर आणि डी ब्लॉकमधील २१.२८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या
काँक्रीटीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून प्रगतीपथावर आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
दरम्यान, तिसऱ्या टप्यात ‘एमआयडीसी'तील उर्वरित राहिलेल्या ३०.७४ कि.मी. रस्त्यांच्या विकासासंदर्भात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक झाली. सदर बैठकीत १५ कि.मी. लांबीचे रस्ते ‘एमआयडीसी'ने आणि १५ कि.मी. लांबीचे रस्ते महापालिकने करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार ‘एमआयडीसी'ने जेम्स ॲन्ड ज्वेलरी झोन मधील ए ब्लॉक आणि इलेक्ट्रॉनिक झोनमधील एल ॲण्ड टी रोड वगळता उर्वरित रस्त्यांच्या सुधारणेसाठी निविदा काढल्या आहेत.