दोघा आफ्रिकन नागरिकांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने सापळा लावून अटक

खारघर परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेले दोघे आफ्रिकन नागरिक अटकेत 

नवी मुंबई : खारघर सेक्टर-३५ भागात मॅथाक्युलॉन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा आफ्रिकन नागरिकांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने रविवारी दुपारी सापळा लावून अटक केली आहे. अॅनी चिमेजी बेन्जामिन (२५) व प्रिन्स एनडी अॅडव न्युडे (३५) अशी या आफ्रिकन नागरीकांची नावे असून गुन्हे शाखेने त्यांच्या जवळ असलेले सुमारे ५ लाख ६५ हजार रुपये किमतीचे मॅथाक्युलॉन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या दोघांनी सदरचे अंमली पदार्थ कुठून आणले ? तसेच ते कुणाला विक्री करण्यासाठी आले होते, याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

खारघर सेक्टर- ३५ मधील तळोजा जेल रोडकडुन टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन परदेशी नागरिक मॅथाक्युलॉन हे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार गत रविवारी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, पोलीस उप निरीक्षक प्रताप देसाई व त्यांच्या पथकाने तळोजा जेल रोडकडुन टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला होता. यावेळी अॅनी चिमेजी बेन्जामिन व प्रिन्स एनडी अॅडविन न्युडे हे दोघे आफ्रिकन नागरिक त्या भागात संशयास्पदरित्या आले असता, गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा आफ्रिकन नागरिकांची धरपकड केली.

 त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांची झडती घेतली असता, ॲनी चिमेजी बेन्जामिन याच्याजवळ २७.७८ ग्रॅम वजनाचे २ लाख ७७ हजार रुपये किमतीचे तर प्रिन्स एनडी अॅडविन न्युडे याच्याकडे २८.८६ ग्रॅम वजनाचे २ लाख ८८ हजार रुपये किमतीचे प्लास्टीकच्या पारदर्षक पिशवीत मॅथाक्युलॉन हे अमंली पदार्थ तसेच मोबाईल फोन आढळुन आले. त्यामुळे गुन्हे शाखेने या दोघांजवळ असलेली मॅथेक्युलन पावडर जप्त करुन दोघांना अटक केली आहे. या दोघा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनी सदरचे अंमली पदार्थ कुठून व कुणाला विक्री करण्यासाठी आणले याबाबत गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एमआयडीसी'तील रस्ते काँक्रीटीकरणामुळे उद्योगवाढीस चालना