सिडको जवळील बस थांब्याच्या शेडमधील बसण्यासाठी असलेल्या स्टीलच्या आसनाचा पत्रा कापून बाहेर
सिडको भवन शेजारील बसथांब्यांच्या शेडचा पत्रा ठरु शकतो जीवघेणा ?
नवी मुंबई ः सिडको भवन जवळील बस थांब्याच्या शेडमधील प्रवाशांकरिता बसण्यासाठी असलेल्या स्टीलच्या आसनाचा पत्रा कापून बाहेर आलेला आहे. मात्र, सदर प्रकार अनेकदा प्रवाश्यांना माहित नसल्याने तिथे प्रवासानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी सदर फाटलेला पत्रा घातक ठरत आहे. त्यामुळे या बसथांब्यावरील फाटलेल्या पत्र्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. बेलापूर येथील सिडको भवन आणि कोकणभवन या दोन इमारतीमधील मुख्य रस्त्यावर सिडको भवन इमारतीच्या लगत असलेल्या पदपथाला लागून महापालिकेने बसथांबा भारलेला असून त्यावर पत्र्याचे शेड देखील उभारण्यात आलेले आहे. सदर बस थांब्यावरुन दररोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. या बस थांब्याच्या शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या स्टीलच्या पत्र्याची एक बाजू मधोमध फाटली गेलेली आहे. तसेच तिचा फाटलेला पत्र्याचा भाग बाहेर आलेला असल्यामुळे तिथून प्रवासाकरिता बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना पत्रा लागून किंवा घासून दुखापत होत आहे. सदर पत्रा प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. महत्वाची बाब म्हणजे एखाद्या मधुमेही रुग्ण असणाऱ्या प्रवाशाला जर पत्रा लागून जखम झाल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते, असे येथून प्रवासाकरिता येणारे प्रवासी चर्चा करीत असतात. त्यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाने सदर पत्र्याची त्वरित दुरुस्ती करुन प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.