व्हर्टीकल गार्डनचा प्रयोग फसल्याने यापुढे शहरात व्हर्टीकल गार्डन संकल्पना बंद करण्याचा निर्णय
व्हर्टीकल गार्डन प्रयोग बासनात; दरवर्षी लाखो रुपयांचा चुराडा
वाशी ः नवी मुंबई शहरात जागो जागी महापालिकेच्या वतीने व्हर्टीकल गार्डन तयार करण्यात आले. मात्र, योग्य देखभाली अभावी त्यातील झाडे मरण पावत असल्याने करोडो रुपयांचा खर्च वाया जात आहे. त्यामुळे शहरात यापुढे व्हर्टीकल गार्डनची संकल्पना बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी झाडांची भिंत म्हणजेच व्हर्टीकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची निवड करुन ती लावली जात आहेत. नवी मुंबई शहरात सध्या औद्योगिक कंपन्या, वाहने, विकास कामे यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदुषण होत आहे. तसेच वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रदुषण पातळी कमी करण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिरवळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे.
शहरात विविध ठिकाणी अशी झाडांची भिंत उभारण्यात येत आहे. या व्हर्टीकल गार्डनमध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांमधून ऑक्सीजनची निर्मिती होत असते. त्यामुळे सदर व्हर्टीकल गार्डन शहरातील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त करत महापालिकेने करोडो रुपये खर्च करुन सदर प्रयोग राबवला होता. मात्र, पाण्याअभावी या गार्डन मधील झाडे पूर्णपणे सुकून मरण पावतात. त्यामुळे महापालिकेने करोडो रुपये खर्च करुन राबवलेला व्हर्टीकल गार्डनचा प्रयोग फसल्याने यापुढे शहरात व्हर्टीकल गार्डन संकल्पना बंद करणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे.