‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळीची संगणकीय सोडत संपन्न
‘सिडको'ने केले पूर्ण हजारो परिवारांच्या घराचे स्वप्न
नवी मुंबई ः ‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ करिता संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिडको भवन येथे यशस्वीपणे पार पडली. ‘सिडको'ार्फे २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सदर महागृहनिर्माण योजना सादर करण्यात आली होती. या योजनेतून नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील ७,८४९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. ‘सिडको'तर्फे साकारण्यात आलेली सदर आत्तापर्यंतची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची सर्वात मोठी योजना होती. नागरिकांचा देखील या योजनेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सदर सोडत माजी लोकायुवत सुरेश कुमार आणि मोईस हुसेन यांच्या उपस्थितीत पार पडली.
दरम्यान, महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ मध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांचे ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी अभिनंदन केले. तर सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी ‘सिडको'मुळे नवी मुंबईसारख्या सोयी-सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
‘सिडको'च्या माध्यमातून परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभलेल्या नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये या परवडणाऱ्या दरातील ७,८४९ सदनिका प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. उलवे नोड वेगाने विकसित होणारा आणि परिवहनदृष्ट्या समृध्द नोड आहे. या योजनेतील गृहसंकुलांना नेरुळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, आगामी एमटीएचएल महामार्ग याद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच ‘सिडको'तर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमुळे उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘सिडको'तर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉपटवेअर) पूर्णतः मानवी हस्तक्षेपविरहीत आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करुन घेतले जाते. तसेच सोडतीदरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक ((Random)) पध्दतीने सरमिसळ करण्यात येते. अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात येते.
महागृहनिर्माण योजना दिवाळी -२०२२ च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी ‘सिडको'च्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.