कालावधी-१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च; थकीत कर भरण्याचे महापालिकेचे आवाहन
मालमत्ता कर धारकांसााठी विशेष अभय योजना
नवी मुंबई ः मालमत्ता कर नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने आणि यामधून प्राप्त होणाऱ्या महसुलातूनच विविध नागरी सुविधा कामे केली जातात. नियमित कराच्या वसुलीप्रमाणेच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी थकित मालमत्ता कराच्या वसुलीकडेही तितकेच बारकाईने लक्ष दिले आहे. तरीही मागील दोन वर्षांपासून कोव्हीड प्रभावित काळातील लॉकडाऊन तसेच कोव्हीड लाटेच्या कमी-अधिक झालेल्या प्रभावामुळे अनेकांच्या उद्योग, व्यवसायावर तसेच नोकरीवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे जे नागरिक आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता कर विहीत वेळेत भरु शकले नाहीत, अशा मालमत्ताकर धारकांना त्यांच्या थकबाकीमुळे लागलेल्या दंडात सवलत मिळावी यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी पासून १५ मार्च पर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर सूट तसेच त्यानंतर १६ फेब्रुवारी पासून ३१ मार्च पर्यंत ५० टक्के सूट देणारी अभय योजना लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
सन २०२२-२३ चे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा, महापालिकेचा थकीत मालमत्ता कर वसूल होऊन रक्कम नागरिकांच्या सेवासुविधांसाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून नागरिकांना दिलासा देणारी अभय योजना लागू केली आहे.