आर्ट ऑफ लर्निंग संस्थेचा विशेष उपक्रम
नवी मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा
नवी मुंबई : योगाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आणि योगाचा प्रसार करण्यात अग्रेसर असलेल्या आर्ट ऑफ लर्निंग या संस्थेच्या वतीने नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय योगासन चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या २ एप्रिल रोजी वाशी येथील सेक्टर १४ मधील बुद्ध प्रतिष्ठानमध्ये पार पडणार आहे. स्पर्धेत व्हिएतनाम, नेपाळ, चीन, दुबई आणि ओमानसह विविध देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. आर्ट ऑफ लर्निंगने राबवलेला हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच असल्याने स्पर्धकांमध्ये या स्पर्धेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्याच्या धावपळीच्या काळात योग किती महत्त्वाचा आहे, योगामुळे आरोग्य कसे सुदृढ राहू शकते, मानसिक तणाव कसा दूर करता येतो, याचा घराघरात प्रसार करण्यासाठी संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना योगाची आवड निर्माण व्हावी, यासाठी या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा जरी एप्रिल महिन्यात होत असली तरी स्पर्धकांना नोंदणी मात्र येत्या २८ फेब्रुवारीच्या आत करावी लागणार आहे. स्पर्धेच्या माहितीसाठी आणि नोंदणीकरिता स्पर्धकांना ८०८०२१२८५१ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती आर्ट ऑफ लर्निंग संस्थेच्या संचालिका योगगुरू डॉ. रिना अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियनचे चार्टर्ड प्रेसिडेंट डॉ. प्रताप मुदलीयार हेही उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी योगगुरू डॉ. रिना अग्रवाल यांना म्हाडा मुंबई, नवी मुंबई महापालिका, सिडको, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स, इंडियन योगा असोसिएशन, महर्षी योग आणि निसर्गोपचार परिषद आणि मुंबई ब्लेसिंग्स स्टुडिओ यांनी विशेष सहकार्य केले आहे. स्पर्धक या स्पर्धेमध्ये योगाचे सहा प्रकार सादर करणार आहेत. स्पर्धकांचे मूल्यमापन काटेकोरपणे होण्यासाठी ३८ परीक्षक उपलब्ध राहणार आहेत.
पालिका शाळेतील मुलांना मोफत प्रवेश
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील आणि विदेशातील स्पर्धांबरोबर योगासने करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी हा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. रिना अग्रवाल यांनी केले आहे.