नवी मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४चा अर्थसंकल्प जाहिर, कोणतीही करवाढ नाही
अर्थसंकल्प वास्तवदर्शी आणि विकासाभिमुख -आयुवत राजेश नार्वेकर
नवी मुंबई ः मागील उद्दिष्टपूर्ती करणारे ११४५.०३ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह ४९२५ कोटी जमा आणि ४९२२.५० कोटी खर्चाचे, २.५० कोटी शिल्लकीचा आणि कोणतीही करवाढ नसणारा नवी मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी १७ फेब्रुवारी रोजी जाहिर केला. याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुजात ढोले, संजय काकडे, उपायुवत (प्रशासन) नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर, मुख्य लेखा-वित्त अधिकारी इंगळे, आदि उपस्थित होते.
दरम्यान, मागील २ वर्षांच्या कोव्हीड प्रभावित कालखंडामुळे आणि त्यातील लॉकडाऊन मुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अर्थकारणाची गतीही मंदावली. या सर्व बाबींचा विचार करुन सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक सादर करताना कोणत्याही प्रकारची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. तरीही याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होणार नाही याचीही खबरदारी घेत उत्पन्न आणि खर्च या योग्य ताळमेळ राखून लोकांना अपेक्षित असलेल्या नागरी सुविधा पुर्ततेची काळजी घेण्यात आलेली आहे. याकरिता कामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकास गती वृध्दींगत होत राहील, असा प्रयत्न आहे. एकंदरीतच वर्तमानाचे भान राखून नागरिकांना अपेक्षित अशा शहर विकासाला नवा आयाम देणारा सदरचा वास्तवदर्शी आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे, असे आयुवत राजेश नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले.
दुसरीकडे मागील दोन वर्षात कोव्हीडमुळे आरोग्य सेवेचे मुळचेच असणारे महत्व आणखी प्रकर्षाने जाणवलेले असून महापालिकेची रुग्णालये आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासोबतच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण गुणवत्ता विकासासाठी, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक, आर्थिक दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम राबविण्यावर अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आलेला असल्याचे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
त्याअनुषंगाने मागील अंदाजातील अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा विचार करुन नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील अत्याधुनिक स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील, आरोग्यपूर्ण शहर साकारले जावे, याकडे सदरचे अंदाजपत्रक सादर करताना विशेष लक्ष देण्यात आल्याचे आयुवत नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्तांनी जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात ४९२५ कोटी रुपये जमा अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये जीएसटी करापोटी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान आणि मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्रापत होणारे शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता उपयोगिता, विविध सेवा आणि इतर साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक संस्था कर (१६२६.३५ कोटी), मालमत्ता कर (८०१ कोटी), विकास शुल्क (३६० कोटी), पाणीपट्टी (१०८.१२ कोटी), परवाना-जाहिरात शुल्क (१०.३७ कोटी), अतिक्रमण शुल्क (४ कोटी), मोरबे धरण-मलनिःस्सारण (४१.४८ कोटी), रस्ते खोदाई शुल्क (२९.१६ कोटी), आरोग्य सेवा शुल्क (१४.०५ कोटी), केंद्र-राज्य शासन पुरस्कृत योजना (५०५.९९), सकीर्ण जमा (२७९.४२ कोटी) आणि आरंभीची शिल्लक (११४५.०३ कोटी) असा जमेचा रुपया अपेक्षित आहे.
खर्चाचा रुपयामध्ये एकूण ४९२२.५० कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. यामध्ये नागरी सुविधा (१३१८.२९ कोटी), प्रशासकीय सेवा (७५२.६४), पाणी पुरवठा-मलनिःस्सारण (५६८.५3 कोटी), इतर नागरी सुविधा (५५६.८४ कोटी), ई-गव्हर्नन्स (१२५०.०८ कोटी), सामाजिक विकास (७३.४५ कोटी), स्वच्छ महाराष्ट्र-घनकचरा व्यवस्थापन, क्षेपणभूमी (४०६.३७ कोटी), केंद्र-राज्य शासन पुरस्कृत योजना (१८१.७६ कोटी), आरोग्य सेवा (२२५.२३ कोटी), परिवहन (२७४ कोटी), आपत्ती निवारण, अग्निशमन (८७.०२ कोटी), शासकीय कर परतावा (१५७.५० कोटी), शिक्षण (१८४.४८ कोटी), अतिक्रमण (११.२६ कोटी) या बाबींचा समावेश आहे.