आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील ग्रामपंचायती पाणी बिल थकवण्यात आघाडीवर
उरणच्या १५ ग्रामपंचायंतीनी थकवले एम आय डी सी चे २६ कोटी ७० लाख रूपयांचे पाणी बिल
उरण : उरण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीना रानसई धरणातून एम आय डी सीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र या २० पैकी १५ ग्रामपंचायतीनी एमआयडीसीचे गेले कित्येक वर्षे पाणी बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांची पाणी बिलाची थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची जानेवारी २०२३ अखेर पाणी बिलाची २६ कोटी ७० लाख ५८ हजार ३२२ रुपये इतकी थकबाकी आहे. विशेष म्हणजे यामध्ये आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील ग्रामपंचायती आघाडीवर आहेत. तालुक्यातील भेंडखळ, जासई, बालई, तेलीपाडा आणि बोकडविरा या पाच गावानीच एमआयडीसीचे पाणी देयक भरली आहेत.
उरण तालुक्यातील २० ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना रानसई धरणातून पाणीपुरवठा हा एम आय डी सीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.त्यासाठी ग्रामपंचायतींकडून रहिवाशांकडून नित्य नियमाने पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र एमआयडीसीला पाण्याचे बील भरण्यामध्ये टाळाटाळ केली जाते.त्यामुळे या ग्राममपंचायतींकडे कोट्यावधींची थकबाकी साठली आहे.या ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्यास त्यांची मिटर नादरूस्त दंड, मंजूर कोटा दंड, मिटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचे एमआयडीसीने जाहिर केले आहे. नुकतेच बोकडविरा ग्रामपंचायतीने आपले पाणी देयकाचे बील भरले असता त्यांची १ कोटी ६५ लाख रूपये दंड, विलंब शुल्क मिटर नादरूस्त दंड आदीचे माफ करण्यात आले आहेत.
उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि २० ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र पाणीपुरवठ्याची बीले भरण्याची तत्परता मोजक्या काही ग्रामपंचायती वगळता बऱ्याचश्या ग्रामपंचायतीकडून दाखविली जात नाही.त्यामुळे थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा- १ कोटी २१ लाख २८ हजार ८४४, हनुमान कोळीवाडा- ३९ लाख २ हजार ८५९, करळ-८८ लाख ३३ हजार १६३, धुतुम- १ कोटी २९ लाख ८१ हजार २३६, जसखार-१ कोटी ९५ लाख २ हजार, फुंडे- ३ कोटी ७ लाख १९ हजार ३४, सावरखार- ५४ लाख १६ हजार २८६, डोंगरी-६१ लाख १४ हजार ८४४, सोनारी- १ कोटी ५८ लाख ३१ हजार ९८६, नागाव-१ कोटी ४२ लाख ६९ हजार २५२, चाणजे-८ कोटी ५२ लाख ८८ हजार ७८, चिर्ले- २ कोटी २३ लाख २० हजार, केगाव- २ कोटी ४ लाख ४३ हजार ४००, म्हातवली- ८७ लाख ४५ हजार ८६३, आदि तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या थकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ,सावरखार, या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव,म्हातवली,चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १२ ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटीसाही बजावण्यात येत आहेत.मात्र त्यानंतरही थकबाकीदार ग्रामपंचायतीकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. ग्राममपंचायतींकडे असलेल्या कोट्यावधींची असलेल्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकास कामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण येथील एम आय डी सीचे उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी दिली.