टक्केवारीचा पाळणा लावून ‘आप'तर्फे निषेध

नवी मुंबईत दिवाबत्ती घोटाळा?

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका तर्फे नको त्या नागरी सुविधांवर वेळोवेळी होणारा वायफळ खर्च तसेच ‘आप'च्या दिल्ली सरकारच्या धर्तीवर प्रत्येक नागरी सुविधा कामाची मंजुरी, त्या त्या प्रभागातील सामान्य नागरिकांचे मत घेऊन, त्या कामाचे सोशल ऑडिट घेऊनच झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन ‘टीम-आप नवी मुंबई'तर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

रस्ते-फुटपाथची अनावश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी, जाहिरातबाजी आदि गोष्टींवर करोडो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेमध्ये एक नवीन दिवा-बत्ती घोटाळा उघडकीस आलेला आहे. यामध्ये फक्त हॅलोजन दिव्यांऐवजी एलईडी दिवे बदलण्या साठी आधीचे सुस्थितीतील पूर्ण खांब आणि केबलिंग नवीन टाकण्याचा वायफळ खर्च करण्यात आला आहे. नवी मंुंबईतील अनेक भागांमध्ये चांगले रस्ते खोदून या विद्युत खांबांसाठी केबल फिरवलेल्या दिसत आहेत. केबल टाकण्यासाठी खोदलेले चर अजुनही तसेच आहेत. ‘टीम-आप नवी मुंबई'तर्फे कोपरखैरणे येथे अशाच एका डबल दिवाबत्ती खांबाच्या जागेवर जाऊन त्या खांबांना कंत्राटदारांच्या टक्केवारीचा पाळणा बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.
सदर टक्केवारीच्या पाळणा आंदोलनात ‘टीम-आप नवी मुंबई'चे कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम, ऐरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष देवराम सुर्यवंशी, जिल्हा सहसचिव नीना जोहरी, वॉर्ड अध्यक्ष धनवंती बच्चन, किरण कुंदारे, छगन पटेल, कपिलदेव शर्मा आदिंसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


सदर आंदोलनाच्या अनुषंगाने ‘टीम-आप नवी मुंबई'तर्फे महापाालिका आयुवत राजेश नार्वेकर यांना विविध प्रश्न नमूद असणारे निवेदन देण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब बदलण्याआधी महापालिकेने त्रयस्थ यंत्रणेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले होते का?, जुने खांब विकले असते तर त्यातून किती रक्कम प्राप्त झाली असती?, वीज बचतीसाठी सोडियम पेपर लावण्याचा प्रामाणिक हेतू असेल तर अनेक ठिकाणी एका कामावर चार एलईडी दिवे लावण्यामागचे प्रयोजन काय? ( दस्तुरखुद्द आयुक्त निवासस्थान समोरील रोडवर ४ दिवे लावलेले आहेत), वीज बजतीच्या नावाखाली एलईडी लाईट बसवले असले तरी शहरातील अनेक भागांमध्ये सूर्यास्तापूर्वी आणि सूर्योदयानंतर विजेच्या खांबावरील बल्ब सूर्यप्रकाशाशी स्पर्धा करताना दिसतात. महापालिकेने विजेच्या खांबावरील बल्ब वेळेनुसार चालू बंद होण्यासाठी लाखो रुपयांचे कंत्राट दिलेले आहे असे असताना अवेळी दिवे चालू असतात.  फोटो सेन्सिटिव्ह यंत्रणा कार्यान्वित नसताना ठेकेदाराची बिले अदा कशी केली जातात?  महापालिकेतील हाय मास्ट दिवा घोटाळ्यावर देखील प्रकाश टाकण्याची गरज आहे. बहुतेक ठिकाणी नगरसेवकांनी मनमानी पध्दतीने आपल्या निवास, कार्यालय समोर हायमास्ट बसून घेतलेले असून त्याच्या शेजारी अनेक ठिकाणी पथदिवे देखील सुरु असल्याचे दिसते. गेल्या दहा वर्षात हायमास्ट दिवे लावणे आणि देखभाल यावर किती खर्च केला? यावर देखील चर्चा व्हायला हवी, आदि मुद्दे सदर निवेदनाद्वारे ‘आप'तर्फे उपस्थित करण्यात आले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थी-पालक रंगले नृत्यात!