महापालिकाने लावले जास्त आयुर्मानाचे जीआय विद्युत खांब

 अष्टकोनी जीआय विद्युत खांबांमुळे ‘नवी मुंबई'च्या सौंदर्यात भर

नवी मुंबई ः ‘सिडको'मार्फत १९७० साली विकसित करण्यास सुरुवात झालेल्या नवी मुंबई शहरातील विविध नोडस्‌ मधील दिवाबत्ती टप्याटप्याने १९९८ पासून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. तसेच २००५ मध्ये ‘एमआयडीसी' मार्फत औद्योगिक क्षेत्रातील दिवाबत्ती व्यवस्थाही महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे.

या हस्तांतरीत दिवाबत्तीमध्ये असलेले विद्युत खांब एमएस धातुचे असून त्याचे आयुर्मान ‘सीपीडब्ल्युडी'च्या निकषानुसार साधारणतः २० वर्षे आहे. नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसलेले असल्यामुळे येथील रस्त्यांवर सिडको आणि ‘एमआयडीसी'ने लावलेले एमएसचे दिवाबत्ती खांब दमट वातावरणामुळे लवकर गंजून खराब होत असल्याचे निदर्शनास येत होते. या अनुषंगाने नागरिक तसेच लोकप्रतिनिधींमार्फतही महापालिकेला सदर विद्युत खांब बदलणेबाबत वारंवार सूचना करण्यात येत होत्या.

२०१८ पासून यामधील काही एमएसचे गंजलेले पोल पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आणि पोल बदलण्यासाठी महापालिकेकडे तसेच शासनाच्या नगरविकास विभागाकडेही सूचना करण्यात आल्या. सन २०२० मधील परिस्थिती बघता २८ ठिकाणी विद्युत खांब पडल्याचे आणि त्या दुर्घटनेत ५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे, अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. सदर सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करुन महापालिका प्रशासनामार्फत खराब झालेले आणि गंजलेले विद्युत खांब बदलण्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन फेब्रुवारी २०२०च्या महासभेत प्रस्तावास मान्यता दिली होती.

या प्रस्तावानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या ३१ हजार विद्युत खांबांपैकी ५ हजार विद्युत खांब वेळोवेळी विविध कारणांसाठी बदलण्यात आल्यामुळे उर्वरित १७ हजार खराब झालेले विद्युत खांब बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्याअनुषंगाने पालिका क्षेत्रातील सर्व विद्युत खाबांचे त्रयस्थ पक्षामार्फत पर्यवेक्षण करण्यात येऊन त्यामधील खराब झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम सुरु करण्यात आले. यामध्ये १७ हजार पैकी १३ हजार इतकेच एमएसचे खराब झालेले विद्युत खांब बदलण्यात आले असून त्याठिकाणी जास्त आयुर्मान असलेले जीआयचे अष्टकोनी विद्युत खांब लावण्यात आलेले आहेत.

 सदर जीआयचे विद्युत खांब बसविताना या खाबांच्या किंमतीबाबतही सतर्कता राखण्यात आली असून इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेने कमी किंमतीत सदर खांब उपलब्ध करुन घेतलेले आहेत. सिडको आणि एमआयडीसी मार्फत बसविण्यात आलेले एमएसचे विद्युत खांब जमिनीत खड्डा खोदून बसविण्यात आलेले असून ते खराब होण्याचे प्रमाण अधिक होते. महापालिकेने नवीन जीआयचे विद्युत खांब बसविताना याची विशेष काळजी घेत सिमेंट काँक्रीटचा चौकोनी पाया बनवून त्यावर मेटल स्क्रूने नवीन खांब बसविलेले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उच्च न्यायालय नियुक्त पाणथळ, खारफुटी समितीच्या बैठकांमध्ये अनियमितता