असिस्टंट लोको पायलट अंजनीकुमार यावर खांदा कॉलनी येथील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल

रेल्वेच्या लोको पायलटला मारहाण करुन मोबाईल फोन खेचणारा लुटारु जेरबंद 

नवी मुंबई  : लोको पायलटच्या हातातील मोबाईल फोन खेचुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारुला पकडण्यासाठी गेलेल्या लोको पायलटलाच सदर लुटारूने बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गत शनिवारी रात्री पनवेल रेल्वे स्थानकात घडली. इजाज सलीम शेख (२९) असे या लुटारुचे नाव असून पनवेल रेल्वे पोलिसांनी त्याला जबरी चोरी करुन मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या लुटारुच्या मारहाणीत जखमी झालेल्या लोको पायलटला पनवेल मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणात जखमी झालेल्या रेल्वेच्या लोको पायलटचे नाव अंजनीकुमार बिंद (३०) असे असुन तो कल्याण पुर्व येथे राहण्यास आहे. सध्या तो पनवले रेल्वे स्टेशन येथे असिस्टंट लोको पायलट कार्यालयात संगणक ऑपरेटरचे काम करत आहे. गत शनिवारी अंजनीकुमार याला सेकंडशीप असल्याने तो दुपारी ४ वाजता आपल्या कामावर आला होता. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तो जेवण करुन फलाट क्रं.-१ वरील आपल्या कार्यालयाच्या बाहेर मोबाईल फोनवर बोलत उभा होता. याचवेळी इजाज सलीम शेख (२९) या लुटारूने अंजनीकुमार याच्या हातातील मोबाईल फोन खेचुन पळ काढला. मात्र तो नशेत असल्यामुळे खाली पडला..

यावेळी अंजनीकुमार याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, इजाज याने अंजनीकुमार त्याचा मोबाईल फोन झाडावर फेकुन दिला. त्यानंतर त्याने अंजनीकुमार याच्या तोडांवर व नाकावर हाताने ठोसे मारले. त्यानंतर त्याने बाजुला पडलेला दगड उचलुन त्याच्या डोक्यात मारला. त्यामुळे अंजनीकुमार याच्या नका तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन तो जखमी झाल्याने त्याने आरडा-ओरड केली. यावेळी रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारु इजाज याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी जखमी अंजनीकुमार याला खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकाने लावले जास्त आयुर्मानाचे जीआय विद्युत खांब