नवी मुंबईकरांच्या मागणीला मूर्त स्वरुप

ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका

नवी मुंबई ः नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान करणाऱ्या ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईकरांसाठी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याला मागणीला मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. ऐरोली-काटई या मार्गावर काटईकडे जाताना नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका तयार करण्यात येणार आहेत.

दरम्यान,  मुंबईकडे जाताना चढण्यासाठी मार्गिकेचा कार्यादेश पुढील दहा दिवसात निघणार असून उतरण्यासाठीच्या मार्गिकेबद्दल आमदार नाईक ‘एमएमआरडीए'चे आयुक्त श्रीनिवासन यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. ऐरोली-काटई मार्गाच्या कामाची पाहणी आ. गणेश नाईक यांनी १४ फेब्रुवारी रोजी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आमदार संदीप नाईक, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, सौ. नेत्रा शिर्वेÀ, यांच्यासह इतर पदाधिकारी, महापालिका आणि ‘एमएमआरडीए'चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऐरोली-काटई मार्गाचा उपयोग नवी मुंबईकरांना करता यावा यासाठी माजी आमदार संदीप नाईक यांनी काटई तसेच मुंबईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची मागणी सर्वप्रथम ‘एमएमआरडीए'कडे केली होती. आ. गणेश नाईक यांनी त्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या मार्गाचा नवी मुंबईकरांना लाभ झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली होती. आमदार नाईक यांनी या मार्गावर नवी मुंबईकरांना मार्गिकांसाठी ‘एमएमआरडीए'च्या आयुक्तांना वेळोवेळी पत्र दिली होती. राज्य विधीमंडळाच्या डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अधिवेशनामध्ये सदर विषयही उपस्थित केला होता. नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सदर विषय एमएमआरडीए प्रशासनाकडे मांडण्यास सूचित केले होते. अखेरीस या अविरत पाठपुराव्याला यश आले असून नवी मुंबईकरांना या मार्गाचा वापर करता येणार आहे. ऐरोली-काटई मार्ग्राला डिसेंबरचा मुहूर्त... डिसेंबर २०२३ मध्ये १२ कि.मी. लांबीचा ऐरोली-काटई मार्ग वाहतुकीसाठी खुला होणारा असून त्यामुळे महापे शिळफाटा मार्गे कल्याण त्यापुढे बदलापूर, मुरबाड, अंबरनाथ याकडे जाण्यासाठी लागणारा एक तास प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. ऐरोली-काटई मार्ग ऐरोली मधील रहिवासी क्षेत्रातून जातो आहे. थ्री एक्सल सारखे मोठमोठे ट्रक या मार्गावरुन जाणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होणार आहे. या ध्वनी प्रदुषणाचा रहिवाशांना त्रास होऊ नये याकरता नॉइज बॅरियर बसविण्याची मागणी नाईक यांनी ‘एमएमआरडीए'कडे केली आहे. ऐरोली-काटई मार्गामुळे ज्या सोसायट्यांना अडचण अथवा गैरसोय निर्माण झाली आहे किंवा त्या बाधित झाल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील नाईक यांनी  केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

असिस्टंट लोको पायलट अंजनीकुमार यावर खांदा कॉलनी येथील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल