महापालिका अधिकाऱ्यांचे बोटचेपे धोरण

 नवी मुंबई शहरात ‘अनधिकृत होर्डिंग'चे पेव

तुर्भे ः नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडत आहे. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय असलेल्या बेलापूर किल्ले गावठाण चौकातही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवसाचे जाहिरात फलक लागलेले दिसून येतात. याशिवाय तुर्भे-वाशी परिसरातील एपीएमसी मार्केटमध्ये विविध वाणिज्य पतसंस्था कार्यालय आहेत. या पतसंस्थांचे सभा, अध्यक्ष यांची निवड तसेच वाढदिवस यासाठी शुभेच्छा देणारे अनधिकृत होर्डिंग राजरोसपणे कोणतीही अनुमती न घेता लावलेले असतात. राजकीय लोकांच्या होर्डिंगवर कारवाई होत नसल्याचे पाहून नोकऱ्या विषयी जाहिरातीचे पोस्टर, वाणिज्य आस्थापने त्यांच्या उत्पादनाची जाहिरातबाजी करताना दिसतात.  विशेष म्हणजे महापालिकेच्या नाकावर टिचून अनधिकृत होर्डिंग दिमाखात झळकत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिका मुख्यालयातील अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन चौक, पोलीस आयुक्तालयकडे जाणारा चौक, दिवाळे गाव, आग्रोळी गाव, नेरुळ अक्षर चौक, गायमुख चौक, सारसोळे बस डेपो, समाधान चौक, एलपी चौक, राजीव गांधी उड्डाणपूल चौक, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, आयसीएल शाळा चौक, अरेंजा सर्कल, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर-५ चौक, घणसोली या ठिकाणी नियमितपणे वर्षाचे १२ महिने हमखास अनधिकृत होर्डिंग लागलेले असतात. या प्रकरणी वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे नोंद केल्यास अनधिकृत होर्डिंगबाजीला आळा बसणार आहे. तसेच संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असतानाही महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

अनधिकृत होर्डिंग प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपायुक्तांसह सर्व संबंधितांवरती कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य करदाते करत आहेत.

दरम्यान, अनधिकृत होर्डिंग प्रकरणी संबंधित कसुरदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तक्रार आपण महापालिका आयुक्तांकडे केली आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल नाईक यांनी सांगितले.

या प्रकरणी अमरीश पटनिगिरे यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईकरांच्या मागणीला मूर्त स्वरुप