महापालिका आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

वाशी मधील जुहु चौपाटीवर जैविक कचरा

वाशी ः नवी मुंबईतील वाशी जुहू चौपाटी येथे उघड्यावर जैविक कचरा फेकून दिल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या कचऱ्यात नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाची कागदपत्रे देखील आढळून आली आहेत. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालय आणि नोंदणीकृत इतर खासगी रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा अर्थात, बायोमेडिकल वेस्टची व्हिल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेला रुग्णालयातील जैविक कचरा नेऊन तांत्रिक पध्दतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आले आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे संबंधित  शासकीय खासगी रुग्णालय आणि त्या डॉक्टरांची जबाबदारी आहे. हीच नियमावली ‘खाजगी क्लिनिक'ना देखील असून, ठरवून दिलेल्या संस्थेकडे त्यांनी जैव वैद्यकीय कचरा देणे आवश्यक आहे. डॉक्टर वा रुग्णालयांनी जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. प्रसंगी क्लिनिक वा दवाखाना बंदही केला जाऊ शकतो. मात्र, जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत नियमावली असून देखील वाशी जुहू चौपाटीवर जैविक कचरा टाकल्याची बाब समोर आली आहे. या कचऱ्यात नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाची काही कागदपत्रे देखील आढळून आली आहेत. वाशी जुहू चौपाटी नवी मुंबईतील एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. जैव वैद्यकीय कचऱ्याला जर कुणाचा स्पर्श झाला तर नागरी आरोग्याला घातक ठरण्याची  शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------
वाशी जुहू चौपाटीवर आढळून आलेला कचरा आणि कागदपत्रे वाशी मधील महापालिका रुग्णालयातील नसून एखाद्या नागरी आरोग्य केंद्रातील असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. तरी देखील या कचऱ्याची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. - डॉ. प्रशांत जवादे, अधीक्षक - नवी मुंबई महापालिका रुग्णालय, वाशी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका अधिकाऱ्यांचे बोटचेपे धोरण