सानपाडा पादचारी पुलाचे काम  कधी पूर्ण होणार ?

नवी मुंबई :- सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे एमआयडीसी  पोलिस ठाण्यासमोरील सानपाडा येथे  पादचाऱ्यांना रस्ता पार करता यावा म्हणून पादचारी पुलाची निर्मिती केली आहे. मात्र  बांधलेला पादचारी पूल अर्धवट असून एका बाजूचे पुलाचे काम अजून बाकी आहे. त्यामुळे या ठिकाणी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. तेव्हा सदर पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सायन पनवेल महामार्गावर रस्ता पार कारण्यासाठी पादचारी पूल बांधला  आहे. मात्र हा पूल एकाच रस्त्यावर बांधलेला आहे व उर्वरित रस्त्यावर पुलाचे बांधकाम केले नाही. परिणामी पादचाऱ्यांना अर्धा रस्ता आपला जीव मुठीत घेऊन तर अर्धा रस्ता पुलावरून पार करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या पादचारी पुलाचे काम रस्ता रुंदीकरणामुळे रखडले होते. मात्र आता  रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तरी देखील या पुलाचे काम करण्यात आले नाही. सायन-पनवेल महामार्ग हा भरधाव वेगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे हा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची दमछाक होते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना किमान १० ते १५ मिनिटे थांबावे लागते. त्यानंतर धावत रस्ता ओलांडावा लागतो. लहान मुले व महिला सोबत असतील तर जास्त हाल होतात. त्यामुळे या ठिकाणी उर्वरित पुलाचे काम पूर्ण करावे म्हणून स्थानिक लोक प्रतिनिधींसह अनेकांनी मागण्या केल्या होत्या. मात्र त्या मागण्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने केराची टोपली दाखवली आहे. तर मनपा हद्दीतील सायन पनवेल महामार्ग देखभाल दुरुस्तीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जीवाशी होणारा संभाव्य धोका पाहता या पादचारी पुलाचे काम महापालिकेनेच करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पनवेल महामार्गावर तुर्भे एमआयडीसी  पोलिस ठाण्यासमोरील सानपाडा येथे अर्धवट पादचारी पूल असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मात्र अशी परिस्थिती असून देखील या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने पुरते दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा पादचारी पुल आता महापालिकेनेच पूर्ण करावा. - प्रवीण पाटील, सामजिक कार्यकर्ते ,वाशी

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा रेल्वे स्थानकात महिना अखेर लोकलला थांबा?