वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभुमीवर नवीन परिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणखी ३ पोलीस ठाण्यांची  होणार भर

नवी मुंबई  : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु आहेत. या सर्व प्रकल्पांचा विचार करुन भविष्यात नवी मुंबई, पनवेल व उरण भागातील नागरीकरणात देखील वाढ होणार असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवीन परिमंडळ  निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आणखी ३ पोलीस ठाणी प्रस्तावित करण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत्या काही वर्षात आंतराष्ट्रीय विमानतळासह, न्हावाशेवा शिवडी सी लिंक, लॉजिस्टीक हब, जेएनपीटी बंदर, द्रोणागीरी, नैना यासारखे अनेक महत्वाकांशी प्रकल्प सुरु होणार आहेत. त्यामुळे पनवेल, उरण भागामध्ये येत्या काही वर्षात नागरिकरणात वाढ होणार आहे. नवी मुंबई विमानतळ  आणि पनवेल उरण पट्टयातील वाढत्या नागरिकरणाचा विचार करुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ -३ प्रस्तावित करण्यात आले आहे. या परिमंडळमध्ये नेरुळ , सीबीडी, एनआरआय, उलवे, खारघर, कामोठे,  कळंबोली आणि तळोजा या पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे.

त्याचप्रमाणे येत्या काही वर्षात सुरु होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी  एअरपोर्ट हे स्वतंत्र पोलीस ठाणे, तसेच ऐरोली विभागासाठी ऐरोली पोलीस ठाणे, त्याचप्रमाणे उलवे विभागासाठी उलवे पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आले आहे. या तिन्ही पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

 सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परिमंडळ -१ मध्ये दिघा ते सीबीडी-बेलापुर या पट्टयातील १० पोलीस ठाणे, तर परिमंडळ -२ मध्ये खारघर ते पनवेल आणि उरण या पट्टयातील १० पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. यात आता एअरपोर्ट, उलवे आणि ऐरोली या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे.

दरम्यान, सिडकोचे कार्यक्षेत्र असलेल्या रसायनी आणि खालापूर या दोन परिसरांचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात समावेश करण्याच्या हालचाली शासनाकडुन मध्यंतरी सुरु होत्या. मात्र त्याबाबत शासनाकडुन अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. मात्र भविष्यात नैना क्षेत्र विकसित करण्याची जबाबदारी सिडकोवर असल्याने हे क्षेत्र देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणार आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाचे नियोजन सुरू आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विहित काळात विकासकाकडून कन्व्हेयन्स डीड प्रक्रिया पूर्ण