डॉ. राजळे यांची सहाय्यक आयुवत पशुसंवर्धन शहापूर-ठाणे पदावर नियुक्ती 

महापालिका उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांची बदली 

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालय (पुणे) मार्फत विभागातील पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदावरील ७० अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, गट-अ या पदावर तात्पुरती पदोन्नती देऊन त्यांची नव्याने पदस्थापना केली आहे. पदोन्नतीमुळे या अधिकाऱ्यांची पशुसंवर्धन (मुख्यालय) विभागाचे सहआयुवत डॉ. शितलकुमार मुकणे यांनी राज्यात इतरत्र बदली  झाल्याचे आदेश पारित केले आहेत. 

दरम्यान, बदली झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुवत तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांचा देखील समावेश आहे. त्यांची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, शहापूर-ठाणे या पदावर बदली करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन आयुवतालय (पुणे) अंतर्गत पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदावर कार्यरत असणाऱ्या ७० अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुवत पशुसंवर्धन, गट-अ या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या कार्यरत पदावरुन इतरत्र बदली करण्यात आली आहे. तसेच पदोन्नती नंतर पदस्थापनेच्या पदावर हजर होण्यासाठी संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुवत करावे आणि बदलीचे आदेश निघाल्यापासून ३० दिवसांच्या आत पदस्थापनेच्या जागी रुजू व्हावे, असे आदेश सहआयुवत पशुसंवर्धन (मुख्यालय) डॉ. शितलकुमार मुकणे यांनी  नुकतेच काढले आहेत. 

नवी मुंबई महापालिकेत येण्यासाठी प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ...

 नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणुन प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. बाबासाहेब राजळे यांची शहापूर लघुपशुसंवर्धन चिकित्साचे सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आल्यामुळे, रिक्त होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त पदावर आपली वर्णी लागावी यासाठी प्रतिनियुक्तीवर येऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे.  

डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात राज्यात लम्पि आजाराची साथ सुरू झाल्याने, पशुधन विभागाने त्यांना त्यांच्या विभागात परत बोलावले होते. परंतु, सदर बदली आदेश रद्द करण्यात डॉ. बाबासाहेब राजळे यांना यश आले. परंतु आता त्यांना पदोन्नती देऊन त्यांची नव्याने शहापूर येथे पदस्थापना केल्याने नवी मुंबई महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील उपायुक्ताचे एक पद रिक्त  होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या १० उपायुक्त पदांपैकी ५ पदे पदोन्नतीने तर ५ पदे प्रतिनियुक्तीने भरली जातात. सद्यस्थितीत डॉ. बाबासाहेब राजळे, श्रीराम पवार, नितीन नार्वेकर, सोमनाथ पोटरे, आणि मंगला माळवे  हे ५ अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.  त्यामुळे डॉ. बाबासाहेब राजळे यांची बदली झाल्यास रिक्त होणाऱ्या जागी आपली वर्णी लावण्यासाठी मंत्रालयात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. 

 दरम्यान, नवी मुंबई महापालिकेत पदोन्नतीने पाच उपायुक्त नेमणूकीचे प्रावधान असले तरी पदोन्नतीने पात्र ठरणाऱ्या तीनच अधिकाऱ्यांना उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे उपायुक्ताची दोन पदोन्नतीने भरावयाची पदे अनेक वर्षापासून रिक्तच आहेत. त्यात आता उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार  हे फेब्रुवारी अखेरपर्यंत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पदोन्नतीचे आणखी एक उपायुक्ताचे पद हे रिक्त राहणार आहे. तर तीन महिन्यांनी आणखी एक उपायुक्त सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदावर नेहमीच डोळा राहिला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत आता  प्रतिनियुक्तीवर  कोण अधिकारी येतात याकडे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभुमीवर नवीन परिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव