अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा चमत्कारामागील विज्ञान कार्यक्रम संपन्न

चमत्कारांमागे अनेकदा विज्ञानाचाच आधार असतो

नवी मुंबई ः ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने श्री गणेश सभागृहात ९ फेब्रूवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेरुळ शाखेचे प्रमुख कार्यवाह रमेश साळुंखे यांनी चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम अनेक सप्रमाण उदाहरणे देऊन सादर केला.

राजीव देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की अंधश्रद्धा निर्मूलनाला विवेकवादी समाजाची निर्मिती करावयाची आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवावा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. उपस्थितांशी संवाद साधताना रमेश साळुंखे यांनी घटनेच्या चौकटीतच धर्माची चिकित्सा अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत असल्याचे स्पष्ट करुन धर्म हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे, परंतु त्यातल्या वाईट रीती, परंपरा या समाजाला पोषक नसल्याचे नमूद केले. देवदासी प्रथा, जटा प्रथा अशा प्रकारच्या गोष्टींचं निर्मूलन झालं पाहिजे आणि त्या दुर्लक्षित घटकांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, असं सांगून ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा सर्व जाती धर्मात आहेत. त्यांचंही निर्मूलन होऊन समाजाचे प्रबोधन झालं पाहिजे. बुवा महाराज जे काही चमत्कार करतात त्यामधील हात चलाखी तसेच त्यामध्ये असणारं विज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी उपस्थितांमधील व्यक्तींना सहभागी करून घ्ोऊन स्पष्ट केले.

या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे राजीव देशपांडे हेही सहभागी झाले होते. यावेळी प्रसंगी पांडुरंग क्षेत्रमाडे, संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, पदाधिकारी दीपक दिघे, अजय माढेकर, प्रभाकर गुमास्ते, रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, श्रीमती सीमा आगवणे, सुचित्रा कुंचमवार, विजय सावंत, दत्ताराम आंब्रे, विकास साठे आदी मान्यवर तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ. राजळे यांची सहाय्यक आयुवत पशुसंवर्धन शहापूर-ठाणे पदावर नियुक्ती