महापालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढवू नये -आ.गणेश नाईक

आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्याची गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प-२०२३ मध्ये मालमत्ताकर  किंवा पाणीपट्टीत कोणतीही दरवाढ करु नये, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. आरोग्य,शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच १११ प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सुचवलेल्या विविध नागरी सुविधा कामांसाठी निधी राखीव ठेवावा, अशी मागणी देखील आ. गणेश नाईक यांनी केली आहे.

महापालिकेचा अर्थसंकल्प तयार होत आहे. या अर्थसंकल्पासाठी आमदार नाईक यांनी नवी मुंबईतील  विकासाच्या अनुषंगाने अनेक सूचना केल्या आहेत. यामध्ये विकास कामांसोबतच नागरिकांच्या हिताच्या सुचनांचा समावेश आहे. सदर सुचनांचे निवेदन ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनात केलेल्या सुचनांचा  समावेश येत्या बजेटमध्ये करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे आमदार नाईक यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिकामध्ये आ. गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असताना त्यांच्या सुचनेनुसार गेली २० वर्षे  महापालिकेने एकदाही मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मध्ये वाढ केली नाही. त्यामुळे यापुढील पाच वर्षे देखील प्रॉपर्टी आणि वॉटर टॅक्समध्ये कोणतीही वाढ करु नये, यासाठी आमदार नाईक आग्रही आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षे आमदार नाईक यांनी अर्थसंकल्पात मागणी करुन मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू दिली नाही.

सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिका मध्ये प्रशासक म्हणून राजेश नार्वेकर काम पाहत आहेत. निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्त्विवात आल्यानंतर बजेटमध्ये आवश्यक विकास कामांना आणि जनकल्याणाच्या योजनांसाठी निधीची तरतूद अगोदरच केलेली असावी, याकरिता सुचनांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे.


कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिघडलेली होती. शिक्षण, आरोग्य आणि रोजचे खर्च भागविताना नाकी नऊ आले होते. आता कुठे नागरिक कोरोनाच्या कठीण काळातून सावरत असताना त्यांच्यावर  करवाढीचा बोजा टाकणे योग्य होणार नाही. ज्याप्रमाणे मागील वर्षी मालमत्ता आणि पाणी कर न वाढवता जनतेला दिलासा देण्यात आला आहे, त्याप्रमाणे यंदाच्या बजेटमध्ये देखील दिलासा द्यावा. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत शोधून त्यामधून महापालिकेने आपले उत्पन्न वाढवावे, असा सल्ला आ. नाईक यांनी दिला आहे.  आ. गणेश नाईक यांनी भविष्यात नवी मुंबईत आवश्यक आरोग्य, शिक्षण, पायाभूत, पर्यावरण, दळणवळणाची कामे, नागरी सुविधा, भविष्यातील शहराच्या आणि नागरिकांच्या गरजांनुसार सांप्रत काळात हाती घ्यावयाचे विकास प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, परिवहन सेवा, महिला, युवक आणि ज्येष्ठांच्या कल्याणाच्या योजना आदिंविषयी मौलिक सूचना केलेल्या आहेत.

बजेट अंतर्गत तरतुदींची शिफारस...
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पहाता भविष्यातील पाणी पुरवठा वाढविण्यासाठी पाताळगंगा ते मोरबे धरण पर्यंत पाईपलाईन टाकून पावसाचे पाणी धरणामध्ये साठवणूक करावी. पाणी गळती थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. बेलापूर ते वाशी, वाशी ते ऐरोली आणि ऐरोली ते दिघा सर्व नोडला जोडणारा कोस्टल रोड ठाणे-बेलापूर मार्गावरुन वाशी कडून ठाणेकडे जाणाऱ्या मार्गावर महापे येथून कोपरखैरणेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाला नवी मार्गिका जोडण्याकरिता तरतूद करण्यात यावी. कनेक्टिविटी वाढवून सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाणपुलांसाठी ठाणे-बेलापूर रोडवर मुकुंद कंपनीसमोर भुयारी मार्ग, रबाले तलावाजवळ उड्डाणपुल, पावणे पुल येथे मार्गिका तयार करणे, तुर्भे नेक्सा शोरुम समोर भुयारी मार्ग, तुर्भे बास्फ कंपनी येथे मार्गिका, कोपरखैरणे गुलाबसन्स डेअरी आणि राजधानी स्वीट मार्टस्‌ येथे एस्कलेटर आणि स्कायवॉक, दिघा येथे ठाणे-बेलापूर रोडवर एस्कलेटर आणि स्कायवॉक. दिघा, ऐरोली, घणसोली, रबाले, कोपरखैरणे, पावणे, वाशी, तुर्भे, जुईनगर, सानपाडा, नेरुळ, सीवुडस्‌, सीबीडी-बेलापूर परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी स्कायवॉक उभारण्याकरिता तरतूद करण्यात यावी. मोराज सर्कल येथे उड्डाणपुल, नेरुळ चौक येथे उड्डाणपुल, वझिराणी चौक येथे उड्डाणपुल, टी.एस. चाणक्य करावे येथे उड्डाणपुल, सीवुडस्‌ अक्षरचौक येथे उड्डाणपुल, एनआरआय चौक येथे उड्डाणपुल, सीवुडस्‌ सेक्टर-५० येथे उड्डाणपुल, आग्रोळी ते महामार्गाला जोडणारा उड्डाणपुल, बेलापूर मार्गावर भुयारी मार्ग, महापालिका आयुक्त निवास ते तेरणा कॉलेज उड्डाणपुल, वाशी प्लाझा ते घणसोली उड्डाणपुल, तुर्भे एपीएमसी चौक येथे उड्डाणपुल.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने दंड