जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान

नवी मुंबईत २ लाख बालकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बालकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ९ फेब्रुवारी पासून जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे.

 या अभियान कालावधीत महापालिका कार्यक्षेत्रातील ० ते १८ वर्ष वयोगटातील मुले-मुली यांच्या सर्वांगीण तपासण्या करण्यात येणार आहेत. सदर अभियान महापालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षेतेखाली सिटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

सदर अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षवयोगटातील सर्व मुले-मुली यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ९ फेब्रुवारी पासून पुढील आठ आठवडे म्हणजेच ४५ ते ४८ दिवस अभियान राबविले जाणार असून यामध्ये तपासणीअंती आवश्यकता भासल्यास संबंधित मुलांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सदर अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागामार्फत योग्य नियोजन करण्यात आले असून शासकीय, निमशासकीय, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, दिव्यांगशाळा, अंगणवाडी, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालय, वसतिगृहे, खाजगी नर्सरी, बालवाडी, खाजगी शाळा, खाजगी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळाबाह्य ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तपासणी करण्यात येणार आहे.

अभियानाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक आणि आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दैनंदिन तपासणी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आयएमए आणि आयएपी यांची सभा घेण्यात आलेली आहे. तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचीही सभा घेण्यात आली आहे. सदर अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक प्रसिध्दी मोहीम राबविण्यात आली असून बॅनर आणि होर्डींग प्रमाणेच विभागाविभागात ठिकठिकाणी माइकिंग करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शासकीय, अनुदानीत, खाजगी, दिव्यांग विशेष अशा शाळा, बालगृहे, अनाथालये, आश्रमशाळा अशा विविध २८३ शाळांच्या ठिकाणी १,७३,९१३ बालके असून एकूण ३५२ अंगणवाडी, बालवाडींच्या ठिकाणी ३७,९०१  बालके आहेत. त्यानुसार ४५ पथकांद्वारे अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.    

अभियान अंतर्गत सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ, ऐरोली येथे दर मंगळवार आणि शुक्रवारी संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान द्वारे देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेत एकप्रकारे आपल्या देशाचा भविष्यकाळ सुदृढ असण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे.
-राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१६ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी  या कालावधीचा प्रतिदिन ५०/- रुपये दंड