माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून भव्य ‘महाराष्ट्र जत्रोत्सव' ला प्रारंभ
जुईनगर मधील ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नवी मुंबई ः महाराष्ट्र महोत्सव समिती तसेच ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्रीराजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून जुईनगर, सेवटर-२२ मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजुला सुरु असलेल्या भव्य ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'ला नवी मुंबईकर जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘महाराष्ट्र जत्रोत्सव'मध्ये लहान मुलांचे सांस्कृतिक कर्यक्रम आयोजित करुन त्यांच्या कलागुणांना वाव देत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर मेळाव्याला नागरिकांसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. जुईनगर मधील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव देण्याचे काम ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'च्या माध्यमातून होत आहे. मुलांना हक्काच व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यामुळे हेच विद्यार्थी पुढे जाऊन नवी मुंबईचे नाव उज्वल करतील, अशी सदिच्छा दशरथ भगत यांनी यावेळी दिली. ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'मध्ये शिरवणे विद्यालय-ज्युनिअर कॉलेज तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम दर्यासारंगा आगरी-कोळी तर स्वर्गीय जनार्दन पाटील विद्यालय शाळा क्रमांक-१७ मधील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ११ फेब्रुवारी रोजी माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वयंभू प्रोडक्शन मुंबई निर्मित हा खेळ लावण्यांचा असा लावण्यांचा अनोखा नजराणा आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार आहे.
जुईनगर मध्ये होत असलेल्या ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'च्या आयोजनाचे यंदा २३ वे वर्ष आहे. ‘जत्रोत्सव'मधील विविध कार्यक्रम नवी मुंबईकरांसाठी मेजवानी ठरणारे आहेत. जुईनगर मधील नागरिक ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'ची आवजुन वाट पाहत असतात. विविध कार्यक्रमांसह लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थांची मेजवानी देखील येथे उपलब्ध आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी ‘महाराष्ट्र जत्रोत्सव'चा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक राजेश पाटील यांनी केले आहे.