श्री सदस्यांसाठी आनंदवार्ता !

ज्येष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

नवी मुंबई ः ज्येष्ठ समाजसेवक तथा निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ‘महाराष्ट्र भूषण निवड समिती'ने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. ८ फेब्रुवारी रोजी रेवदंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पासाहेबांची भेटही घेतली.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निरुपणकार सचिन धर्माधिकारी, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ.महेश बालदी, कोकण विभागीय आयुवत महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कुटुंबिय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा अप्पासाहेब धर्माधिकारी गेली ३० वर्षे निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'च्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलिकडच्या काळात ‘प्रतिष्ठान'ने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव-स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरित्या करण्यात येते. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करुन एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा मध्ये अप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना किर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ आणि पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी अप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांंनी १९४३ सालापासून केली होती. आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करीत आहेत. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना लवकरच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्वाचा बहुमान महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच ‘महाराष्ट्र भूषण निवड समिती'ने सर्वानुमते घेतला आहे. हा मानाचा पुरस्कार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची निश्चितच वाढली आहे. अप्पासाहेबांचे कार्य समाज जीवनात अनेकांच्या मनावर बिंबवले गेले आहे. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी केंद्र शासनाच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मी शासनाच्या वतीने अभिनंदन करुन त्यांचे आभार देखील मानत आहे. -ना.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा पामबीच येथील भुयारी मार्गाचे काम त्वरित हाती घ्यावे