सिलेंडर बाटला पासिंगच्या नावाखाली वाहन चालकांची लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सिलेंडर बाटला पासिंगच्या नावाने लूट

नवीन पनवेल ः पनवेल परिसरात सिलेंडर बाटला पासिंगच्या नावाखाली रिक्षा, कार चालक, इको चालकांची एक प्रकारची लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याने सिलेंडर बाटला पासिंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. पनवेल महापालिका हद्द आणि पनवेल तालुक्यात हजाराची संख्येने इको, रिक्षा आणि कार आहेत. सीएनजीवर चालणाऱ्या या गाड्यांची दर तीन वर्षांनी सिलेंडर बाटला पासिंग करावी लागते. गतवर्षी ८०० ते १००० रुपये पासिंगचा दर असल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले. मात्र, यावर्षी सदर दर २००० ते २२०० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे दुप्पटीपेक्षा जास्त दर वाढवण्यात आलेला आहे. याचा फटका सीएनजी गाड्या चालवणाऱ्यांना बसत आहे. पनवेल मधील इको चालकांनी ४ फेब्रुवारी रोजी सीएनजी बाटला पासिंगच्या दुकानात जाऊन याचा जाब विचारला. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी युनियनला याचे पैसे द्यावे लागतात, असे सांगितले. तर काहींनी बाटला पासिंगचे १५०० रुपये मालकाने घ्यायला सांगितले तरी ते आम्हाला परवडत नसल्याचे सांगितले.

पळस्पे फाटा येथे इको, कार, रिक्षासाठी २१०० रुपये दर असून खासगी कारसाठी २३०० रुपये दर सांगण्यात आला. चिखले फाटा येथे इको, रिक्षा आणि कारसाठी १८०० रुपये तर गिरवले येथे इको, रिक्षा आणि कारसाठी २००० रुपये सिलेंडर बाटला पासिंगचे सांगण्यात आले. सदर तिन्ही ठिकाणी सिलेंडर बाटला पासिंगचे दर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सिलेंडर बाटला पासिंगच्या नावाखाली वेगवेगळे दार आकारुन वाहन चालकांची लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे गाडीमध्ये सीएनजी किट बसवून घ्ोणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, असे असले तरी तीन वर्षांनी होणाऱ्या सिलेंडर टेस्टिंगच्या दरात वर्षभरात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे या सेंटर विरोधात रिक्षा आणि कार चालकांमध्ये नाराजी आहे. बाटला पासिंगच्या दरवाढीमुळे चालक बेजार झाले आहेत. बाटला पासिंगचे वाढलेले दर कमी झाले नाहीत तर रिक्षा, इको आणि कार चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री सदस्यांसाठी आनंदवार्ता !