बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरु

 नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र सागरी मंडळ'च्या (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) वतीने सुरु करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ राज्याचे बंदरे-खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाले. दरम्यान, वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्‌घाटनानंतर ना. दादा भुसे यांनी वॉटर टॅक्सीतून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास केला. ७ फेब्रुवारी रोजी बेलापूर जेट्टी येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बंदरे- परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, नयनतारा शिपिंग कार्पोरेशनचे कॅप्टन रोहित सिन्हा, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल काझानी, आदि उपस्थित होते.

वॉटर टॅक्सी सेवेमध्ये एकूण २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करु शकतात. सदर सेवा नयनतारा शिपिंग कार्पोरेशन आणि इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस मार्फत चालविण्यात येणार आहे. वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईला ५५ मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. तसेच मुंबई आणि परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे ना. भिसे यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबई, ठाणे येथील प्रवाशांना मुंबईत रस्ते मार्गाने जाताना खूप वेळ जातो, तसेच वाहतूक कोंडी होते. रस्ते मार्गावरील ताण कमी करण्यासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया अशी वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेची आणि इंधनाची बचत होऊन वाहनांचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. या सेवेचे दर कमी करण्यासाठी तसेच सेवेच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जेट्टीपासून ते इच्छितस्थळी जाण्यासाठी कनेटिव्हिटी निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे या सेवेचे महत्त्व वाढणार आहे, असे ना. भुसे यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील सागरी किनाऱ्यावर जेट्टीच्या निर्मितीतून मच्छिमार तसेच पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी मदत होणार आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार असून या सेवेला प्रतिसाद मिळाल्यास त्याचे दर कमी करण्यात यावेत. राज्यातील पहिल्या मरिना प्रकल्पालाही गती देण्यात यावी, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

वॉटर टॅक्सी सेवेला प्रतिसाद मिळावा, यासाठी प्रवाशांना, पर्यटकांना विविध सेवा सुविधा देण्यांवर भर देण्यात यावा. तसेच जेट्टीपासून वाहतुकीची सोय करावी जेणेकरुन प्रवाशांची सोय व्हावी. राज्य शासन मेरीटाईम पॉलिसी तयार करत आहे. त्याकरिता सूचना असतील तर पाठवाव्यात, असे आवाहन प्रधान सचिव पराग जैन यांनी केेले.

दरम्यान, वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. यासेवेबरोबरच ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड'च्या वतीने बेलापूर ते एलिफंटा, बेलापूर ते मांडवा मार्गावरही सेवा सुरु आहे. याशिवाय पलेमिंगो राईडही सुरु आहे. लवकरच बेलापूर येथे हॉवर क्रापट सेवा सुरु करणार आहोत. पर्यटनाच्या वाढीसाठी जेट्टीचा वापर व्हावा, या दृष्टीने नियोजन सुरु असल्याची माहिती ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सैनी यांनी प्रास्ताविकातून दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लुप्त होत चाललेल्या खारफुटींच्या संरक्षणासाठी कामांमध्ये मिष्टी आणण्याची गरज