बोनसरीतील विद्यार्थ्यांना ‘एनएमएमटी'तर्फे स्कुल बसची व्यवस्था
तुर्भे गावातील डॉ. सामंत विद्यालयात ये-जा करण्यासाठी ‘एनएमएमटी'च्या माध्यमातून स्कुल बस सुरु
नवी मुंबई ः तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गावातील विद्यार्थ्यांना तुर्भे गावातील डॉ. सामंत विद्यालयात ये-जा करण्यासाठी ‘एनएमएमटी'च्या माध्यमातून स्कुल बस सुरु करण्यात ‘स्त्री मुक्ती संघटना'ला यश आले आहे. गेली अनेक वर्षे या विद्यार्थ्यांना बोनसरीतून तुर्भे येथील शाळेत येण्यासाठी एक तर चालत यावे लागत होते किंवा रिक्षासाठी पैसे मोजावे लागत होते. त्यासाठी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना रिक्षाचा खर्च दिला जात होता. सदर बाब लक्षात घ्ोऊन ‘स्त्री मुक्ती संघटना'ने ‘एनएमएमटी'चे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांची दोनदा भेट घेऊन दगडखाण परिसरात काम करणाऱ्या कामगार वर्गाच्या मुलांना शाळेपर्यत ने-आण करण्यासाठी स्कुल बसची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. ‘स्त्री मुक्ती संघटना'ने केलेल्या मागणीनुसार ‘एनएमएमटी'ने बोनसरी मधील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था नुकतीच सुरु केली आहे.
बोनसरी गांव तुर्भे स्टोअर्स नजिकचा दगडखाण (क्वॉरी) विभाग म्हणून ओळखला जातो. रस्ता, शाळा, दवाखाना, स्कुल बस, आदि मूलभूत सुविधा देखील येथे उपलब्ध नाहीत. ‘स्त्री मुक्ती संघटना'ने याठिकाणी कचरा वेचक महिलांचे आठ बचत गट बांधले आहेत. गॅलेक्सी सरफॅक्टॅन्ट्स् लि. या कंपनीच्या मदतीने या परिसरातील ५७ मुलांसाठी संध्याकाळी माया या बचतगटातील महिलेच्या घरी अभ्यास वर्ग सुरु केले आहेत. सिन्टेल कंपनीच्या माध्यमातून ई-बस येऊ लागली. मुले टॅब हाताळू लागली, अवघड असणारे गणित आणि इंग्रजी विषय शिकू लागली. विशेष म्हणजे ‘स्त्री मुक्ती संघटना'ने सुरु केलेल्या मोफत कॉम्प्युटर कोर्सलाही विद्यार्थी येऊ लागले. महिलांनी मॅजिक बास्केट बनविण्याचे कौशल्य आत्मसात करुन सदर काम सुरु केले.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला बस चालू करण्यासाठी निवेदन आणि ८८ मुलांची यादी दिली. ‘एनएमएमटी'चे व्यवस्थापक योगेश कडुसकर, वाहतूक अधिकारी अनिल शिंदे आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक धर्मराज भगत यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत बोनसरी विभागाला भेट दिली. ‘स्त्री मुक्ती संघटना'च्या मीनाक्षी वांगणेकर आणि मीलन जाधव यांच्यासोबत परिसराचा सर्वे केला. आता बस सुरु झाल्याने समाधान लाभल्याचे ‘स्त्री मुक्ती संघटना'च्या अध्यक्षा वृषाली मगदूम यांनी सांगितले.