‘दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज' अंतर्गत दिवाळे गावातील जुन्या शाळेचा विस्तार
दिवाळे गावातील विविध कामांचे भूमीपुजन
नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजना मध्ये तसेच ‘दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज' अंतर्गत दिवाळे गावातील जुन्या शाळेचा विस्तार करण्यात येणार असून याठिकाणी एकमजली बांधकाम करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी ६ फेब्रुवारी रोजी दिवाळे गावातील शाळेचा पाहणी दौरा केला. तसेच गावातील मार्केट मध्ये अतिरिक्त ३३ गाळे उभारणे, चिकन, मटण आणि भाजी मार्केट उभारणे, गजेबो उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, मासळी मार्केट मागील बाजुस वाहनतळ उभारणे या कामांचा भूमीपुजन सोहळा देखील यावेळी संपन्न झाला.
याप्रसंगी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा बेलापूर विभाग अधिकारी मिताली संचेती, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अभियंता अजय पाटील, पांडुरंग कोळी, रमेश हिंडे, अभिषेक कोळी, संकेत पाटील, संतोष कोळी, ज्ञानेश्वर कोळी, चंद्रकांत कोळी, सुरेखा कोळी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज तयार करावे, असे स्वप्न साकारले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून सन २००४ सालापासून दिवाळे गांव मी दत्तक घेतले आहे. दिवाळे गावामध्ये सोलर सिस्टमचे जाळे पसरविण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजुनही विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.