अनधिकृत परप्रांतीय विक्रेत्यांची घुसखोरी
स्थानिकांच्या एकमेव मासळी विक्री व्यवसायाला उतरती अवकळा
वाशी ः नवी मुंबई मधील आगरी-कोळी समाजाचा मासेमारी, मासे विक्री पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या व्यवसायात परप्रांतीयांनी घुसखोरी केली असून, परप्रांतीयांनी अनधिकृतरीत्या दारोदारी मासे विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याने नवी मुंबईतील स्थानिकांच्या एकमेव शिल्लक पारंपरिक व्यवसायाला उतरती अवकळा लागली आहे. त्यामुळे परप्रांतीयांच्या अनधिकृत मासे विक्री व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
नवी मुंबई शहर वसवण्यासाठी येथील शेतकऱ्यांची सुपीक, खाजन आणि मिठागर अशी १०० टक्वे जमीन शासनाने सिडको मार्फत संपादित केली. त्यानंतर नवी मुंबई शहर वसवण्यात आले. मात्र, नवी मुंबई शहर वसवण्याआधी येथील स्थानिकांचा शेती, मिठ आणि मासेमारी पारंपरिक व्यवसाय होता. परंतु, शेती आणि मिठागर गेल्याने सदर दोन्ही व्यवसाय नष्ट होऊन एकमेव मासेमारी व्यवसाय शिल्लक राहिला. मात्र, नवी मुंबई शहराच्या पूर्व बाजूला असलेल्या औद्योगिक वसाहती मधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे खाडीत मासळीचा दुष्काळ पडत चालला आहे. मासळीच्या दुष्काळाचे संकट घोंगावत असताना मासळी विक्री व्यवसायात देखील परप्रांतीयांनी घुसखोरी केली असून, अनधिकृतरीत्या दारोदारी मासे विक्री सुरु केली आहे. त्यामुळे मासे खवय्यांनी मासळी बाजाराकडे पाठ फिरवल्याने नवी मुंबईतील स्थानिकांच्या एकमेव शिल्लक पारंपरिक व्यवसायाला उतरती अवकळा लागली आहे. परिणामी परप्रांतीय मासळी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक मासळी विक्रेते करीत आहेत.
अनधिकृतरीत्या दारोदारी मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय मासे विक्रेत्यांविरोधात आमदार रमेश पाटील, मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखीले, योगेश शेट्ये यांनी मध्यंतरी आवाज उठवला होता. त्यावर प्रशासनाने थातुर-मातुर कारवाई केली. मात्र, कारवाईत सातत्य न ठेवल्याने परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी नवी मुंबई शहरात पुन्हा आपले बस्तान बसवले आहे.