डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते
ठाणे मधील प्रॉपर्टी प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची भेट
ठाणे ः एमसीएचआय-क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या वतीने ठाणे रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या (प्रॉपर्टी) प्रदर्शनास ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, ‘क्रेडाई एमसीएचआय ठाणे'चे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गरोडिया, राजू व्होरा, बांधकाम व्यावसायिक तसेच राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, ‘रेमंड'चे संदीप माहेश्वरी, ‘एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, आदि उपस्थित होते. दरम्यान, प्रदर्शनानिमित्त आयोजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते यावेळी झाले.
राज्य शासनाने मी नगरविकास मंत्री असताना एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डिसीआर) तयार केली. या नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे. अनेक प्रकल्प सुरु होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या नियमावलीचा फायदा सर्वसामान्यांनाही व्हायला हवा. त्यासोबतच कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला बसलेला फटक्यातून सदर क्षेत्र सावरण्याची स्टॅम्प ड्युटी आणि प्रिमीयम मधून सवलत देण्याचा निर्णय घ्ोण्यात आला होता. त्याचाही मोठा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर थेट ग्राहकाला मिळाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र असून या व्यवसायावर अडीचशे हुन अधिक व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सर्व सवलती देण्याचे काम राज्य शासनामार्फत केले आहे. प्रत्येकाला स्वतःचे चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घरे बनवावित, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना केले.
राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला होणार आहे. रस्ते चांगले असतील तर त्या क्षेत्राचा विकास होतो. त्यामुळे आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.